मुंबई:  नालेसफाईची ५० टक्के कामे पूर्ण करण्यात मुंबई पालिकेच्या यंत्रणेला यश आले. पावसाळय़ापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत नाल्यांतील ७५ टक्के गाळ काढला जातो. मात्र यंदा नालेसफाईची कामे उशीरा सुरू झाल्यामुळे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी १५ मेपर्यंत ५० टक्के गाळ काढण्याचे उद्दीष्टय़ ठरवून दिले होते. त्यानुसार १४ मेपर्यंत ५० टक्के गाळ काढण्यात यश आलेले असले तरी अनेक नाल्यांमधील गाळ काढण्यास अद्याप सुरुवातही झालेली नाही, तर शहर भागात केवळ ३७ टक्के सफाई होऊ शकली आहे.

पावसाळापूर्व नालेसफाईची कामे यंदा उशीरा सुरू झाल्यामुळे यावेळी नालेसफाई वेळेत होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी आधीच नालेसफाईवरून पालिकेवर टीका करायला सुरुवात केली होती. पालिकेची निवडणूक लांबल्यामुळे यंदा पालिकेचा कारभार प्रशासकाच्या म्हणजेच पालिका आयुक्तांच्या हातात आहे. त्यामुळे आयुक्तांनी विशेष खबरदारी घेत यंदा नालेसफाईच्या कामांची प्रगती पाहता येईल, अशी ऑनलाइन यंत्रणा सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक दिवसात किती गाडय़ांनी किती गाळ वाहून नेला याची छायाचित्रे, आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. नालेसफाई नंतर काढण्यात आलेला गाळ उचलण्यापूर्वी व निर्धारित ठिकाणी गाळ टाकण्यापूर्वी; अशा दोन्ही वेळी गाळाचे वजन करण्यासह दोन्ही वेळा चित्रिकरणदेखील करण्यात येत आहेत. चहल यांनी यंदा नालेसफाईची पावसाळापूर्व कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. दोन पाळय़ांमध्ये काम करावे, जादा मनुष्यबळ व यंत्रसामुग्री वापरावी, असे आदेश देण्यात आले होते.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ गाळ हा पावसाळय़ाआधी काढला जातो. त्याची कामे दरवर्षी १ एप्रिलला सुरू होतात. यंदा मात्र पालिकेची मुदत संपत असताना स्थायी समितीने नालेसफाईचे प्रस्तावच मंजूर केले नव्हते. त्यामुळे प्रशासनाने नंतर आपल्या अधिकारात नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आणि प्रत्यक्षात ११ एप्रिलपासून नालेसफाईची कामे सुरू झाली. ३१ मे पर्यंत ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

दरम्यान, गाळाच्या एकूण उद्दीष्टापैकी ५० टक्के गाळ आतापर्यंत काढून झाला असून ३१ मेपर्यंत उर्वरित २५ टक्के गाळ काढला जाईल, असा विश्वास पर्जन्यजलवाहिन्या विभागाचे उपप्रमुख अभियंता विभास आचरेकर यांनी व्यक्त केला. तर ज्या नाल्यांची रुंदी कमी आहे त्याठिकाणी गाळ काढताना मर्यादा येतात. त्यामुळे तेथील नालेसफाई अद्याप सुरू झालेली नाही, मात्र येत्या आठवडय़ाभरात ती कामे देखील सुरू करून पूर्ण होतील, असेही ते म्हणाले. तसेच शहर भागातील कामांचा वेग कमी असल्यामुळे कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली असून नालेसफाईचे उद्दीष्टय़ पूर्ण करण्याबाबत त्याला सांगण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

या नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष..

पश्चिम उपनगरात मालपा डोंगरी नाला, एलआयसी बॉक्स नाला, नेहरू नगर नाला, नंदादीप नाला, िबबिसार नगर नाला, नेस्को नाला, रेडीअम पहाडी नाला, ज्ञानेश्वर नगर नाला, ज्ञानेश्वर गार्डन नाला, राम नगर नाला, अखिल नाला, पंचोलिया नाला, मजेठिया नाला, धीरज सिंग नाला, जोगळेकर नाला, समर्थवाडी नाला, सिंग इस्टेट बॉक्स नाला, गोराई नाला, चमडावाडी नाला, शहर भागात क्लिव्हलॅण्ड बंदर नाला.