मुंबई : कांदिवली पूर्व येथील ठाकूरगावातील मशिदीचा परिसर हा शांतता क्षेत्र नाही, असा दावा पोलिसांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला. तसेच त्याबाबतची २०१७ साली काढण्यात आलेली अधिसूचनाही न्यायालयात सादर केली. असे असले तरी ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम आणि यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पोलिसांनी काटेकार पालन करावे, असे आदेश मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिले.
त्याच वेळी पोलिसांनी सादर केलेल्या माहितीची दखल घेऊन गौसिया मशीद ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्तीला दिले. एवढेच नव्हे, तर मशिदीवरील ध्वनिक्षेपकाच्या परवानगीसाठी विश्वस्त मंडळाने केलेल्या अर्जावर पोलिसांनी कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.




ठाकूरगाव परिसरातील मशिदीवरील ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या त्रासाची वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांविरोधात वकील रीना रिचर्ड यांनी केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दखल घेतली होती. तसेच रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा वापर केला जाणार नाही याची खात्री करा, असे आदेश दिले होते. त्यानंतरही मशिदीवरील ध्वनिक्षेपकांद्वारे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप रिचर्ड यांनी करून पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली होती.
तसेच पोलिसांकडून आपल्या तक्रारीवर कारवाई केली जात नसल्याचा दावा केला होता. त्यावर याचिकाकर्तीच्या तक्रारींवर काय कारवाई केली याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मशिदीचा परिसर शांतता क्षेत्र नसल्याचे पोलिसांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली.