scorecardresearch

पुन्हा एकदा विजयाबाईंची ‘शाळा’ भरली!

विजयाबाई सभागृहात आल्या तेव्हा अमृता सुभाष व नीना कुलकर्णी यांनी त्यांची गळाभेट घेतली.

विजयाबाई मेहता

मराठी रंगभूमीला नवे परिमाण देणाऱ्या आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, चित्रपट व रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते व अभिनेत्री घडविणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजयाबाई मेहता यांची अभिनय शाळा मंगळवारी पुन्हा एकदा पु. ल. देशपांडे कला अकादमीत भरली होती. या कार्यशाळेत त्यांचे विद्यार्थी अभिनेत्री अमृता सुभाष, अर्चना केळकर-देशमुख, अभिनेता-दिग्दर्शक संदेश कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती.
पंचम निषादतर्फे येत्या २ ते ६ मे या कालावधीत ‘मॅजिक मोमेंट्स-सर्च बाय अ परफॉर्मर अ‍ॅन एन्काऊंटर वुईथ डॉ. विजया मेहता’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवीस कलाकार आणि पाच दिग्दर्शक कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. कला कारकीर्दीच्या मध्यावर असलेल्या कलाकारांसाठी ही कार्यशाळा आहे. कार्यशाळेत स्वत: विजयाबाई मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकार परिषदेसाठी विजयाबाई सभागृहात आल्या तेव्हा अमृता सुभाष व नीना कुलकर्णी यांनी त्यांची गळाभेट घेतली. हा क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकार सरसावले तेव्हा विजयाबाईंनी ‘या माझ्या मुली आहेत,’ असे म्हणून त्यांना मायेने जवळ घेतले. नीना व अमृता या दोघींनी ‘बाई तुम्ही या वयातही किती सुंदर दिसता,’ असे म्हटले तेव्हा त्यांनी ठेवणीतील हास्याने त्याला जणू काही ‘हो’असे म्हणत उत्तर दिले. पत्रकार परिषदेची दिलेली वेळ उलटून गेली तरी पत्रकार परिषद सुरू होत नव्हती तेव्हा, ‘ए चला गं, आपण आपण आता सुरुवात करू या,’ असे विजया बाईंनी सांगितले आणि वातावरणातील अनौपचारिकता गळून पडली.
वीस ते पंचवीस मिनिटांच्या मनोगतात विजयाबाईंनी आजवरच्या नाटय़ानुभवाचे आणि नाटय़कलेचे सार ओघवत्या शैलीत उलगडले. बाईंचे विद्यार्थीही तल्लीन होऊन ऐकत होते. अलीकडची नाटके फारशी पाहिलेली नाहीत. आजची परिस्थिती बदलली असून आत्ता काम करणारी पिढी ही माझ्या नातवंडांच्या वयाची आहे. ते लक्षात घेऊन मी जमेल तशी व जमेल तेव्हा मदत करत असते असे सुरुवातीलाच सांगून नानासाहेब फाटक यांच्या बरोबर १८ वर्षांची असताना केलेले नाटक, त्यात साकारलेली ‘कमळजा’ही भूमिका, अल्काझी यांच्याकडे घेतलेले नाटय़ प्रशिक्षण, पीटर ब्रुक यांची भेट आदी आठवणींना उजाळा दिला.

ही कार्यशाळा म्हणजे माझ्यासाठीही शिकणे आहे. येथे मी शिक्षिका नाही तर या मंडळींकडून मलाही खूप काही शिकायला मिळते. टाळीसाठी वाक्य म्हणू नका, असे मी माझ्या नटांना नेहमी सांगत असते. अमुक एका परिणामासाठी कोणतीही गोष्ट करू नका, तर त्या गोष्टी फुलल्या पाहिजेत. प्रसिद्धी आणि पैसा मिळू दे, तो मिळविणे चुकीचे नाही. पण मी हे सर्व यासाठीच करतोय का, असा प्रश्न कलाकारंनी स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे.. वेगवेगळ्या वाटांचा अस्वस्थ शोध तुम्ही सतत सुरू ठेवा. तो शोध घेणे संपले की तुम्ही कलाकार म्हणून संपता.’
– विजयाबाई मेहता

विद्यार्थ्यांचे मनोगत
काही वर्षे कलाकार म्हणून काम केल्यानंतर तेच तेच करायचा कंटाळा येतो, मनावर मरगळ येते. आपल्यातील उत्स्फूर्तता कमी होते. अशा वेळी बाईंची कार्यशाळा मनाला ताजेतवाने करते. आत्मविश्वास वाढतो आणि आनंद घेण्याची क्षमता बाई मिळवून देतात.
– नीना कुलकर्णी

कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर त्या कलाकारामध्ये जादू घडल्यासारखा बदल घडतो. त्या जादूची पूर्वतयारी बाई करुन घेतात.
– संदेश कुलकणी

बाईंची कार्यशाळा केली आणि मला आयुष्यभराचा खजिना मिळाला. कलाकाराला एखादी भूमिका मिळाल्यानंतर त्या भूमिकेच्या बिजाला कल्पनाशक्तीचे धुमारे फुटले पाहिजेत. ते धुमारे फुटण्याचे काम कार्यशाळेत होते. भूमिकेची लय कशी शोधायची याचे मार्गदर्शन मिळते. मला कार्यशाळेत ‘हमिदाबाईची कोठी’ या नाटकातील ‘सईदा’चा आवाज मिळाला.
– अमृता सुभाष

मी १९९१ पासून बाईंबरोबर आहे. त्यांच्या ‘नागमंडल’मध्ये होते. बाईंची कार्यशाळा करणे म्हणजे माझ्यासाठी दीर्घकाळाचा रियाज असतो.
-अर्चना केळकर-देशमुख

यांच्यासोबत अमृता सुभाष आणि नीना कुलकर्णी.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Acting school of veteran theatre personality vijaya mehta

ताज्या बातम्या