मुंबई : दोन वर्षांनंतर मुंबईत मोठय़ा जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा होत असताना वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या सहा हजार १४४ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ४,८०० हून अधिक जणांवर आणि एका दुचाकीवर तिघांनी प्रवास केल्याने ५३१ दुचाकीस्वारांवर बडगा उगारण्यात आला आहे.

विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ५८१ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. याशिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या २२३ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शहरात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली. पश्चिम उपनगरात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या सर्वाधिक म्हणजे १६३१ दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. दक्षिण मुंबईत विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या सर्वाधिक म्हणजे १८४ चालकांवर कारवाई केली, तर दक्षिण मुंबईत ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या २१९ जणांवर कारवाई करण्यात आली. प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या सर्वाधिक वाहनांवर पूर्व उपनगरांत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पूर्व उपनगरांत १०० चालकांवर कारवाई करण्यात आली.

दादर- प्रभादेवी परिसरात मोठय़ा प्रमाणात राजकीय दहीहंडय़ा रंगल्या असताना याच परिसरातून सर्वाधिक दुचाकीस्वारांना विनाहेल्मेट पकडण्यात आले. एकटय़ा दादर विभागाने विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या ३६९ दुचाकीस्वारांवर कारवाई केली. याशिवाय मुलुंड वाहतूक विभागाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ५६ चालकांवर कारवाई केली. ही इतर कोणत्याही विभागाने केलेल्या कारवाईपेक्षा अधिक आहे, तर एकाच दुचाकीवरून तिघांनी प्रवास केल्याप्रकरणी वडाळा विभागाने सर्वाधिक म्हणजे ७८ चालकांवर कारवाई केली. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी दादर व प्रभादेवी परिसरातील अनेक मार्गिका बंद केल्या होत्या. तसेच सर्व पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द करून त्यांना सकाळी आठ वाजल्यापासून विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाया

५८१ विरुद्ध दिशेने वाहने चालवणे

४८०९ विनाहेल्मेट

५३१ ट्रिपल सीट

२२३ क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी