भाडे नाकारून प्रवाशांना नाहक मनस्ताप देणाऱ्या टॅक्सी-रिक्षाचालकांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सरकारने केली आहे. अशा मग्रूर टालकांना वेसण घालण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त पथके स्थापन करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील मोक्याच्या जंक्शनवर ही पथके तैनात करण्यात येणार असून चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काळ्या-पिवळ्या टॅक्सीमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. परंतु अशी यंत्रणा बसविल्यानंतर त्यासाठी चालकाला अतिरिक्त भाडे आकारता येणार नाही.
मुंबईमध्ये सध्या भाडे नाकारण्याचे टॅक्सी-रिक्षाचालकांचे प्रकार वाढले आहेत. परिणामी प्रवाशांचा अनेक वेळा खोळंबा झाल्याचे निदर्शनास येते. याबाबत अनेक प्रवाशांनी तक्रारीही केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी-रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सरकारने केली आहे. अशा चालकांवर कारवाई आणि दंड वसुली करण्यात येणार आहे. टॅक्सीमध्ये मालकाचे परमीट, ओळखपत्र, पोलीस, आरटीओ विभागाच्या हेल्पलाईनचा क्रमांक आदी माहिती टॅक्सीमध्ये ठळकपणे दिसतील अशा प्रदर्शित करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.
काळ्या-पिवळ्या टॅक्सीमध्ये वातानुकूलित यंत्रणेची सुविधा नव्हती. ही सुविधा करावी आणि प्रवाशांकडून भाडय़ामध्ये जादा १० टक्के अधिक आकारणी करण्याची मागणी टॅक्सी युनियनकडून करण्यात आली होती. मात्र कोणतेही अतिरिक्त आकार प्रवाशांकडून वसूल न करता काळ्या-पिवळ्या टॅक्सीमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्याची परवानगी प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आली. या टॅक्सीसाठी ऐच्छिक पद्धतीने जादा रक्कम देण्याचा निर्णय प्रवाशांवर सोडण्यात आला आहे. तसेच कांदिवली, दहिसर, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला आदी भागांमध्ये शेअर रिक्षा स्टॅण्डसाठी परवानगीही देण्यात आली.