scorecardresearch

विद्यार्थ्यांत भेदभाव करणाऱ्या शाळांवर कारवाई ; शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांचा इशारा

विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत पोलीस तक्रार केली असून शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टय़ा त्रास देणाऱ्या, शुल्क भरले नाही म्हणून त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या किंवा त्यांच्यात भेदभाव करणाऱ्या शिक्षण संस्थांची गय केली जाणार नाही, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिला आहे. शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढणाऱ्या कांदिवली येथील शाळेच्या मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पालकांना दमदाटी करणाऱ्या पुण्यातील उंड्री येथील शाळेला नोटीस देण्यात आली आहे.

शुल्कावरून पालक आणि शाळा व्यवस्थापनांतील तिढा अद्यापही कायम आहे. शुल्क वाढवणे, शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना त्रास देणे अशा स्वरूपाच्या पालकांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे सातत्याने येत आहेत. शुल्क भरले नाही म्हणून माध्यमिक वर्गातील काही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार कांदिवली येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नुकताच घडला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत पोलीस तक्रार केली असून शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील उंड्री येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतही मुख्याध्यापकांना भेटायला गेलेल्या पालकांना दमदाटी आणि धक्काबुक्की करण्यात आल्याची तक्रार केल्यानंतरया शाळेला शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे. विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देणे, वर्गाबाहेर उभे करणे, मानसिक त्रास देणे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी कृती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील शाळांचे नामफलक देवनागरीत

मुंबई :  मुंबईतील महाविद्यालयांचे नामफलक देवनागरी लिपीत लिहिण्याच्या बंधनानंतर आता शाळांचे नामफलकही देवनागरीत दिसणार आहेत. मुंबई महापालिकेने शहरातील सर्व शाळांना याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व दुकाने, आस्थापना यांचे नामफलक देवनागरीत असावेत, असा नियम शासनाने केला आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील महाविद्यालयांचे नामफलकही देवनागरीत असावेत, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली होती. त्यानुसार महाविद्यालयांचे नामफलक देवनागरीत लिहिण्याची सूचना विद्यापीठाने दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action against schools for discriminate against students minister varsha gaikwad zws

ताज्या बातम्या