फॅशन स्ट्रीटवर उद्यापासून कारवाई

पालिकेने या परवानाधारक फेरीवाल्यांना फॅशन स्ट्रीटवर जागा आखून दिली होती.

 

५१ फेरीवाल्यांचे परवाने रद्द

अटी आणि शर्तीचा भंग करणाऱ्या आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या दक्षिण मुंबईमधील फॅशन स्ट्रीटवरील तब्बल ५१ फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया गुरुवारी पालिकेने सुरू केली असून या ५१ फेरीवाल्यांवर शुक्रवारी ‘निरीक्षण अहवाल’ बजावण्यात आला. पदापथावरील जागा २४ तासांच्या आत मोकळी करण्याचे आदेश पालिकेकडून शुक्रवारी फेरीवाल्यांना देण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आसपासच्या परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या फेरीवाल्यांना महात्मा गांधी रोडवरील बॉम्बे जिमखान्यासमोर स्थलांतरीत करण्यात आले होते. कालौघात महात्मा गांधी रोडवरील या फेरीवाल्यांमुळे हा परिसर फॅशन स्ट्रीट म्हणून नावारुपाला आला. एका रांगेत उभ्या असलेल्या तब्बल ३९४ दुकानांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी विविध प्रकारच्या तयार कपडय़ांची  विक्री होत असल्याने तरुणाईचे पाय मोठय़ा संख्येने फॅशन स्ट्रीटवर अवतरू लागली. पालिकेने या परवानाधारक फेरीवाल्यांना फॅशन स्ट्रीटवर जागा आखून दिली होती. मात्र या फेरीवाल्यांनी पालिकेने आखून दिलेली वेस ओलांडून पदपथावर आपल्या व्यवसायाचा पसारा वाढविण्यास सुरुवात केली होती. लोखंडी पाइप आणि लाकडी बांबूच्या साह्यने कपडे टांगून हा परिसर विद्रूप केला होता. इतकेच नव्हे तर लोखंडी स्टँड उभे करुन त्यावरही कपडे टांगण्यात आले होते. फेरीवाल्यांनी पसारा वाढवल्यामुळे पदपथावरून चालणे पादचाऱ्यांना अवघड बनू लागले होते. आसपासच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी या फेरीवाल्यांबद्दल अनेक वेळा पालिकेकडे तक्रारीही केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पालिकेने जानेवारी महिन्यात पाहणी करुन येथील परवानाधारक फेरीवाल्यांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. परंतु त्यानंतरही फेरीवाल्यांनी पदपथावरील आपले अतिक्रण हटविले नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता पालिकेने ५१ फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू केली. शुक्रवारी या फेरीवाल्यांना २४ तासाच्या आत पदपथ रिकामा करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे समजते. पादचाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या फॅशन स्ट्रीटवरील उर्वरित परवानाधारक फेरीवाल्यांवर पालिका करडी नजर ठेवणार आहे. परवान्यातील अटी आणि शथींचे पालन न केल्यास आणि पादचाऱ्यांना त्रास दिल्यास उर्वरित फेरीवाल्यांचे परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Action on illegal hawkers in fashion street