अन्न व औषध प्रशासनाकडून १००हून अधिक जाहिरातींचा शोध

मुंबई : गर्भपात करणे, गर्भधारणा रोखणे, पुरुषांमध्ये लैंगिक सुखाची क्षमता टिकविणे इत्यादी औषधांच्या भ्रामक जाहिरातींवर कारवाई करण्याचे पाऊल अन्न व औषध प्रशासनाने उचलले असून अशा १०० हून अधिक जाहिरातींवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती कायदा) १९५४’च्या कलम ३ मध्ये विशिष्ट रोग किंवा विकारांसाठी औषधाच्या भ्रामक जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. गर्भपात करणे, स्त्रियांमधील गर्भधारणा रोखणे, पुरुषांची लैंगिक सुखाची क्षमता टिकविणे किंवा वाढविणे, मासिक पाळीदरम्यान उद्भवणारे आजार बरे करण्याचा दावा करणे अशा जाहिरातींना या कायद्यांतर्गत बंदी आहे. यात कर्करोग, मधुमेह, मेंदूचे विकार, स्त्रीरोग, कार्चंबदू, पक्षाघात, कुष्ठरोग, लठ्ठपणा, लैंगिक नपुंसकत्व, व्यक्तींची उंची वाढविणे अशा ५० आजारांचा यात समावेश केलेला आहे. सध्या अशा जाहिरातींचे प्रमाण वाढले असून यांचा शोध घेऊन यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकाने १०० हून अधिक जाहिरातींचा शोध घेतला.

अन्यथा कठोर कारवाई

कायद्याच्या या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती वर्तमानपत्रे, होर्डिंग्ज, इंटरनेट, संकेतस्थळ, पत्रके, दूरचित्रवाहिनी आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्वरित काढाव्यात अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

भ्रामक जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन

औषध किंवा आजारांवरील उपायांच्या भ्रामक जाहिरातींना बळी पडू नये. तसेच नोंदणीकृत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

तक्रार कुठे करावी?

औषधे व जादूटोणादी उपाय  १९५४ च्या कलमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्यास टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ६८३१ acgbmumzone7@gmail.com  वर कळवावे.