भाईंदर : व्हॉट्सअ‍ॅप समूहाच्या माध्यमातून लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती पसरवणाऱ्या देशपातळीवरील टोळीवर नवघर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी १८ ते २५ या वयोगटातील पाचजणांना अटक करण्यात आली असून लवकरच देशभरातून मोठय़ा प्रमाणात अटक होण्याची शक्यता आहे.

लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती पाहणे, डाऊनलोड करणे, शेअर करणे, त्यावर प्रतिक्रिया देणे अथवा त्या समाजमाध्यमांवरून पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना अशा चित्रफिती प्रोत्साहन देत असल्याने हा कायदा करण्यात आला आहे. असे असतानाही देशपातळीवरील सदस्यांचा सहभाग असलेले चार व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करून त्यात लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती पोस्ट केल्या जात असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली होती. समूहाचे सदस्य होण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून लिंक पाठवली जात होती, तसेच फेसबुकवरही ही लिंक देण्यात आली होती. ‘बी. बी. बॅड बॉईज’, ‘अपने रिस्क पे जॉईन करो’ अशा पद्धतीची नावे या व्हॉट्सअ‍ॅप समूहांना देण्यात आली होती. प्रत्येक समूहामध्ये शंभर ते दीडशे सदस्य असून ते १८ ते २५ या वयोगटातील आहेत. यातील काही जण महाविद्यालयात शिक्षण घेणारे आहेत आणि काही जण नोकरी करणारे आहेत. आतापर्यंत या समूहांमध्ये सुमारे १३० अश्लील चित्रफिती टाकण्यात आल्या आहेत.

भाईंदर पूर्व येथील एक व्यक्ती अशाच पद्धतीने पाठवण्यात आलेल्या लिंकद्वारे या समूहाचा सदस्य बनली, परंतु समूहात लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती येत असल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यक्तीने त्याची माहिती नवघर पोलिसांना दिली. साहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांना याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पहिल्यांदा भाईंदर येथील नवघर परिसरातून एकाला अटक करण्यात आली.

या समूहात विविध ठिकाणचे सदस्य सहभागी असल्याने पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून वसई, विरार आणि मुंबईतून आणखी चारजणांना अटक करण्यात आली. सध्या पोलिसांचे पथक नाशिक आणि डोंबिवली परिसरात आरोपींना अटक करण्यासाठी रवाना झाले आहे. आतापर्यंत २२० सदस्यांनी या चित्रफिती पाहिल्या असल्याचे समोर आले असून यातील ४० जण महाराष्ट्रातील आहेत आणि उर्वरित इतर राज्यांतील आहेत.

५ अटकेत, दोन अ‍ॅडमिनचा शोध सुरू

लहान मुलांच्या चित्रफिती इंटरनेटवर सहज उपलब्ध होत नसल्याने समूहाचे अ‍ॅडमीन त्या विशिष्ट प्रकारच्या संकेतस्थळांवरून पैसे भरून डाऊनलोड करून घेतात अथवा संकेतस्थळ हॅक करून त्या चित्रफिती मिळवतात, अशी माहिती पुढे आली असल्याचे साहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. पकडण्यात आलेल्या समूह सदस्यांकडून सहा मोबाइल जप्त करण्यात आले असून ते सर्वजण गेल्या एक वर्षांपासून या समूहाचे सदस्य होते आणि समूहातील चित्रफिती पाहात होते. या सर्वावर माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समूहामध्ये दोन अ‍ॅडमीन असून त्यांचा शोध सुरू आहे. जप्त करण्यात आलेले मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.