मिठाईच्या आवरणासह मिठाईची विक्री करून ग्राहकांना ‘गुंडाळणे’ विक्रेत्यांना महागात पडले आहे. कारण नुकत्याच वैधमापनशास्त्र विभागाने शहरात केलेल्या तपासणीत मिठाईच्या खोक्यासह मिठाईची विक्री करणाऱ्या ४४९ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याच धर्तीवर ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी वैधमापनशास्त्र विभागाकडून ग्राहकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नामांकित मिठाई विक्रेते मिठाईचे वजन करताना खोक्यासह वजन करत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात होत्या. याच धर्तीवर वैधमापनशास्त्र विभागाने मुंबई व उपनगरांत राबविलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल ४४९ मिठाई विक्रेत्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यात मिठाईच्या खोक्यासह वजन करताना मिठाई कमी देणे, वजनकाटय़ात फेरफार करणे, वस्तूंच्या किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणे, असे विविध प्रकार उघडकीस आले आहेत. शहरात वस्तूंच्या आवरणावर छापील किमतीपेक्षा अधिक किंमत आकारण्याचे गैरप्रकार विक्रेते करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना वस्तूवर दिलेल्या किमतीप्रमाणेच वस्तूची खरेदी करावी. किमतीनुसार वजनाच्या मापात वस्तू बरोबर मिळत आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे. याशिवाय वजनकाटय़ावर वजन करताना त्यावरील आकडय़ावर लक्ष ठेवावे. मिठाई व इतर वस्तू खरेदी करते वेळी त्यांचे वजन खोक्याशिवाय करण्याचे दुकानदाराला सांगावे, असे विभागाने सांगितले आहे. अशात काही गैरप्रकार आढळून आल्यास ०२२-२२८८६६६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कारवाईची प्रक्रिया
ग्राहक म्हणून विक्रेता तुमची फसवणूक करीत असल्यास त्याची तक्रार नियंत्रण कक्षाकडे करावी. या वेळी तुमच्या शहराचे व विभागाचे नाव तसेच सविस्तर तक्रार नोंदवावी. यानंतर वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्याकडून तक्रारीची तपासणी केली जाते. तक्रारीत तथ्य आढल्यास त्या विक्रेत्यावर कारवाई केली जाते. ही कारवाई दहा दिवसांच्या आत केली जात असल्याचे वैधमापनशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.