scorecardresearch

‘लालबागचा राजा’ वाद : पोलिसांशी बाचाबाची करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर होणार कारवाई

ही घटना कैद झालेले सर्व प्रकारचे फुटेज आणि व्हिडिओ तपासून याच्या चौकशीनंतर ही कारवाई होणार आहे.

लालबागचा राजा

मुंबईमधील प्रसिद्ध गणेश मंडळ ‘लालबागचा राजा’च्या मंडपामध्ये चार दिवसांपूर्वी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांसमोर हमरीतुमरीवर आल्याने भक्तांच्या गर्दीतच मंडपामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांच्या कामात अडथळा आणत त्यांच्याशी वाद घालणाऱ्या या कार्यकर्त्यांवर आता कारवाई होण्याची चिन्हे आहेत. ही घटना कैद झालेले सर्व प्रकारचे फुटेज आणि व्हिडिओ तपासून याच्या चौकशीनंतर ही कारवाई होणार असल्याचे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन कळते.

लालबागचा राजाच्या मंडपामध्ये मंगळवारी (दि. १८) गर्दीला आवरत असताना मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांना पोलिसांचा धक्का लागल्याने हा वाद निर्माण झाला होता. दर्शनाच्या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलीस गर्दीवर नियंत्रण मिळवत असताना हा धक्का लागला होता. दोघेही अगदी हमरी-तुमरीवर आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

सुत्रांच्या माहितीनुसार, लालबागचा राजा मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणत त्यांच्याशी वाद घातला. त्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे. मात्र, तत्पूर्वी याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजच नाही तर माध्यमांच्या कॅमेऱ्यांतील चित्रीकरण तसेच भक्तांकडून करण्यात येत आलेले चित्रीकरणही तपासले जाणार आहे. या तपासानंतर जर कार्यकर्त्यांनी जाणूनबुजून वाद घातल्याने निष्पण्ण झाले तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणार आहे. मात्र, सध्या गणेशोत्सवाचे दोन दिवस बाकी असल्याने विसर्जनापर्यंतच्या या काळात पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आहे. हा बंदोबस्त संपल्यानंतर या वादप्रकरणाची तपासणी करण्यात येऊन त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

याप्रकरणी ट्विटवरून आपली भूमिका मांडताना नितेश राणेंनी लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांना उगाच बदनाम केले जात असल्याचा आरोप केला होता. ‘लालबागचा राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना उगाच बदनाम करण्यापेक्षा दुसरी बाजू ही ऐकली पाहिजे. पोलिस ज्या पदतीने कार्यकर्त्यांना हाताळत आणि मारत आहेत तेही चुकीच आहे. हा गणपती नक्की कोणाचा आहे असा सवाल उपस्थित करत ‘लालबागचा राजा पोलिसांचा का स्थानिक कार्यकर्त्यांचा ?’ असेही त्यांनी म्हटले होते.

याआधीही लालबागचा राजाच्या मंडपामध्ये काहीवेळा कार्यकर्त्यांकडून भक्तांना मिळणाऱ्या वागणुकीवरुन लालबागच्या राजा मंडळावर टीका झाली होती. २०१३ रोजी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या गणेशभक्तांना मिळणारी उद्धट वागणूक आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या धक्काबुक्कीची गृहविभागाने गंभीर दखल घेत भक्तांना अवमानास्पद वागणूक देणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांनी दिले होते. त्याशिवाय राजाच्या पायावर माथा टेकवणाऱ्या महिला भाविकांना हुसकावणाऱ्या कार्यकर्त्याचाही व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action will be taken on lalbaghcha raja ganesh mangal workers after investigating the cctv footage