संजय दत्तच्या फर्लोप्रकरणी पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाईचे संकेत गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी दिले.
गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून एखादा कैदी सुटत नाही, फर्लो मंजूर करणे अथवा नाकारणे हा गृहमंत्र्यांचा अधिकार नाही त्यामुळे माझ्यामुळे फर्लो मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे राम शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी हत्यार बाळगल्याप्रकरणी येरवाडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त २९ डिसेंबरपासून १४ दिवसांच्या फर्लो रजेवर होता. ८ जानेवारी रोजी दुपारी आपली रजा संपवून संजूबाबा येरवाडा कारागृहात परतणे अपेक्षित होते परंतु, रजा वाढविण्याच्या अर्जावर निर्णय आला नसल्याने येरवाडात दाखल होण्यास गेलेला संजय दत्त कारागृहाच्या गेटवरूनच गुरूवारी माघारी फिरला आणि पुन्हा मुंबईत आपल्या राहत्या घरी दाखल झाला. याबाबत गृहराज्यमंत्र्यांना विचारणा केली असता, संजय दत्तच्या प्रकरणाकडे आपण बारकाईने लक्ष देत असून कारागृह प्रशासनाकडून संजयच्या वाढीव रजेच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. तसेच यासंबंधी माझ्या अधिन असलेले सर्व अधिकारी नियमांचे पालन करून काम करतील. संजय दत्तच्या फर्लोबाबत माझ्याकडे कोणत्याही प्रकराची तक्रार आल्यास चौकशी करून संबंधित अधिकाऱयांवर कडक कारवाई देखील केली जाईल, असे आश्वासन राम शिंदे यांनी दिले.