मुंबई : साठच्या दशकात लुधियानातून आलेल्या एका पंजाबी तरुणाने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९६० साली प्रदर्शित झालेला ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ हा या तरूणाचा पदार्पणातील चित्रपट. पण त्याला फार काही यश मिळाले नाही. पाठोपाठ १९६१ साली ‘शोला और शबनम’ , ‘अनपढ’ आणि १९६३ मध्ये ‘बंदिनी’ असे त्यांचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. आणि त्यानंतर ‘धर्मेंद्र’ हे नाव नायक म्हणून चित्रपट रसिकांच्या हृदयावर कोरले गेले.

बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘आयी मिलन की बेला’ या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र यांना यशस्वी अभिनेता म्हणून नावलौकिक मिळाला. या चित्रपटात अभिनेता राजेंद्र कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. साठच्या दशकाच्या मध्यात सुरू झालेला त्यांचा यशस्वी चित्रपटांचा सिलसिला पुढे चेतन आनंद दिग्दर्शित ‘हकीकत’, अभिनेत्री मीना कुमारी यांच्याबरोबरचा ‘काजल’, ‘फुल और पत्थर’, ‘अनुपमा’, ‘आए दिन बहार के’ अशा चित्रपटांबरोबर सुरूच राहिला. या दशकात धर्मेंद्र यांनी फक्त प्रेमपटातला नायक साकारला नाही, तर ‘शिकार’सारखा रहस्यपट, ‘मझली दीदी’सारखे सामाजिकपट, हेरगिरीवर आधारित ‘आँखे’, दुहेरी भूमिका असलेला ‘इज्जत’ अशा विविधांगी भूमिका असलेले चित्रपटही त्यांनी केले.

१९६९ मध्ये ‘आयी मिलन की बेला’ हा चित्रपट यशस्वी झाल्यावर त्यांनी लागोपाठ ‘यकीन’, ‘प्यार ही प्यार’, ‘आदमी और इन्सान’, हृषीकेश मुखर्जी यांचा ‘सत्यकाम’ असे यशस्वी चित्रपट दिले. तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय नायक राजेश खन्ना याचा उदय झाला होता. मात्र, तरीही सत्तरच्या दशकाच्या अखेरपर्यंत धर्मेंद्र यांनी स्वत:ला हिंदी चित्रपटसृष्टीचा यशस्वी नायक म्हणून प्रस्थापित केले.

अभिनेत्री हेमा यांच्याबरोबर यशस्वी जोडी

धर्मेंद्र यांच्या १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘जीवनमृत्यू’ या चित्रपटात अभिनेत्री राखी त्यांची नायिका होती. हा चित्रपट यशस्वी ठरला. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘शराफत’ या चित्रपटात धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी ही जोडी पहिल्यांदा एकत्र आल्याचे सांगितले जाते. ‘शराफत’ आणि लागोपाठ आलेला या जोडीचा ‘तुम हसीन मै जवान’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. त्यानंतर राज खोसला दिग्दर्शित ‘मेरा गाव मेरा देश’ या ॲक्शनपटाने त्यांना पुन्हा एकदा यशाची साथ दिली. या चित्रपटात अभिनेत्री आशा पारेख या त्यांच्या नायिका होत्या. १९७२मध्ये हेमा मालिनी यांच्याबरोबर ‘सीता और गीता’ आणि ‘राजा जानी’ हे दोन चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले. त्यानंतर आलेल्या ‘जुगनू’ या चित्रपटानेही अमाप यश मिळवले. त्यानंतर दशकभरात या जोडीने ‘दोस्त’, ‘पत्थर और पायल’, ‘शोले’, ‘प्रतिज्ञा’, ‘चरस’, ‘चाचा भतीजा’, ‘माँ’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आझाद’, ‘दिल्लगी’, ‘दिल का हीरा’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘अलिबाबा और चालीस चोर’ असे डझनावारी चित्रपट केले. त्यातला एखाददुसरा अपवाद वगळता रुपेरी पडद्यावर ही जोडी कमालीची लोकप्रिय ठरली आणि परिणामी चित्रपटही प्रचंड यशस्वी ठरले. याच चित्रपटांच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात फुललेल्या प्रेमाची परिणती १९८० साली विवाह बंधनात झाली. अर्थात, धर्मेंद्र यांचे विवाहित असणे, हेमा मालिनी यांच्या विवाहाला आईवडिलांचा असलेला विरोध, अभिनेता जितेंद्र यांच्याशी हेमा मालिनी यांच्या विवाहाची चर्चा अशी अनेक अवघड वळणे पार करत ही प्रेमकथा आजवर बॉलीवूडची लोकप्रिय आख्यायिका म्हणून गणली जाते.

हृषीकेश मुखर्जींचा लाडका नायक

ॲक्शन हिरो ही बिरुदावली चिकटण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी काही विनोदी ढंगाच्या, काही वास्तविकतेच्या जवळ जाणाऱ्या गंभीर भूमिका केल्या. अगदी सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये त्यांच्या वाट्याला दुय्यम भूमिका आल्या, त्यातही त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला. बिमल रॉय दिग्दर्शित ‘बंदिनी’ हा खऱ्या अर्थाने नायिकाप्रधान चित्रपट, त्यातही छोटेखानी भूमिकेतून धर्मेंद्र लक्षात राहिला. तीच बाब १९६९ साली प्रदर्शित झालेल्या असित सेन दिग्दर्शित ‘खामोशी’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत म्हणता येईल. हाही नायिकाप्रधान चित्रपट, त्यातही वहिदा रेहमान यांच्याबरोबर मुख्य भूमिकेत राजेश खन्नासारखा लोकप्रिय कलाकार असूनही धर्मेंद्र यांची भूमिका लक्ष वेधून घेते. धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वातील अलवारपण आणि प्रेमळ वृत्ती यांचा पुरेपूर उपयोग दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांनी करून घेतला आणि त्यांना कारकीर्दीतील काही उत्तम भूमिका गवसल्या. हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘सत्यकाम’ चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा आजवरची त्यांची सर्वोत्तम भूमिका म्हणून ओळखली जाते. मुखर्जींच्याच ‘अनुपमा’ चित्रपटातली त्यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘गुड्डी’ चित्रपटातली धर्मेंद्र म्हणूनच साकारलेली भूमिका किंवा त्यानंतर ‘चुपके चुपके’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बरोबरीने साकारलेला प्रोफेसर परिमल त्रिपाठी या रूढ प्रतिमांपेक्षा त्यांच्या वेगळ्या भूमिका अधिक लोकप्रिय ठरल्या. बासू चॅटर्जी दिग्दर्शित ‘दिललगी’ चित्रपटातही त्यांचा हा प्रेमी नायक यशस्वी ठरला. बासूंच्याच ‘छोटीसी बात’ चित्रपटात ‘जानेमन जानेमन’ गाण्यात झळकलेली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी लक्षात राहते. व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीतही ‘ब्लॅकमेल’सारखा चित्रपट आणि त्यांच्यावर चित्रित झालेले ‘पल पल दिल के पास’ हे गाणे रसिकमनांवर आजही गारूड करून आहे. ‘मै जट यमला पगला दीवाना’ म्हणत गाणाऱ्या धर्मेंद्र यांचा हा हळुवार मनाचा प्रेमी नायक पुन्हा एकदा कित्येक वर्षांनी अनुराग बासू दिग्दर्शित ‘लाईफ इन अ मेट्रो’ चित्रपटात रसिकांना पुन्हा एकदा अनुभवता आला. त्यानंतर अगदी अलीकडे करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’ चित्रपटात त्यांनी साकारलेले कविमनाच्या आजोबाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. अर्थात, त्यांच्या प्रणयी नायकाच्या भूमिकांची संख्या मोठी असली तरी ‘शोले’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘धरमवीर’सारख्या चित्रपटांनी त्यांची ‘ही-मॅन’ म्हणून रूढ केलेली प्रतिमाच अखेरपर्यंत त्यांची ओळख ठरली.

ऐंशी-नव्वदच्या दशकातील हाणामारीपट

ऐंशीच्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कालावधीत प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटांमध्ये हाणामारीपटांची संख्या अधिक होती. ‘बाझी’, ‘जागिर’, ‘जीने नही दूँगा’, ‘धरम और कानून’, ‘दादागिरी’, ‘हुकूमत’, ‘इन्साफ की पुकार’, ‘पुलिसवाला गुंडा’, ‘मैदान ए जंग’, ‘खतरों के खिलाडी’, ‘नाकाबंदी’ असे खंडीभर हाणामारीपट त्यांनी केले. त्यातल्या त्यात ‘गुलामी’,‘रझिया सुलतान’, ‘वतन के रखवाले’ अशा काही चित्रपटांनी बऱ्यापैकी आर्थिक यशही कमावले. ‘तहलका’ हा त्यांचा मुख्य नायक म्हणून गाजलेला अखेरचा चित्रपट मानला जातो. त्यानंतर कित्येक वर्षांनी ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘जॉनी गद्दार’ अशा चित्रपटांत चरित्र भूमिकांमधून ते चमकले. २००७ मध्ये ‘अपने’ या अनिल शर्मा दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा सनी आणि बॉबी या दोन्ही मुलांबरोबर एकत्र काम केले. या चित्रपटाची प्रसिद्धी आणि वितरण देओल कुटुंबीयांच्याच विजयेता फिल्म्सच्या वतीने करण्यात आली होती. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर हे तिघेही पुन्हा एकदा ‘यमला पगला दीवाना’ या चित्रपटात एकत्र आले. २०१८ साली याचाच सिक्वेलपट ‘यमला पगला दीवाना फिरसे’ नावाने प्रदर्शित झाला.

निर्मात्याच्या भूमिकेत

धर्मेंद्र यांनी १९८१ साली विजयेता फिल्म्स या निर्मितीसंस्थेची स्थापना केली. याच निर्मितीसंस्थेंतर्गत १९८३ साली ‘बेताब’ चित्रपटाची निर्मिती करत मुलगा सनी देओल याला पदार्पणाची संधी दिली. त्यानंतर सनी देओल यांच्या ‘घायल’ आणि ‘घायल वन्स अगेन’, ‘इंडियन’ या चित्रपटांची निर्मितीही विजयेता फिल्म्सनेच केली होती. १९९५ मध्ये धाकट्या बॉबीला चित्रपट क्षेत्रात आणण्यासाठी त्यांनी ‘बरसात’ चित्रपटाची निर्मिती केली. १९९९ मध्ये सनी देओलचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘दिललगी’ चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. पुतण्या अभय देओल याच्या ‘सोचा न था’ या चित्रपटाच्या मागेही त्यांची विजयेता फिल्म्स भक्कमपणे उभी राहिली.

सायरा बानू यांच्याकडून आठवणींना उजाळा

धर्मेंद्र आणि दिलीप कुमार म्हणजे जणू अगदी एकमेकांचे भाऊच. बॅडमिंटन खेळणे, खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणे, हे दोघांना खूप आवडायचे, अशी आठवण सायरा बानू यांनी सांगितली. दिलीप कुमार आणि माझ्यासाठी धर्मेंद्र हा नेहमी कुटुंबातील सदस्याप्रमाणेच होता. दिलीप कुमार त्याला लहान भाऊच मानायचे. नेहमीच्या कामाच्या पलीकडे जाऊन दोघांचे एकमेकांशी संबंध होते. आम्ही एकमेकांच्या चांगल्या-वाईट प्रसंगांत कायम एकत्र राहिलो. दिलीप कुमार यांच्या शेवटच्या दिवसांत काही मोजकी लोकच त्यांना भेटायला यायची, त्यात धर्मेंद्र एक होता. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला धर्मेंद्र रुग्णालय असो वा घरी नेहमी हजर असायचा, असेही त्या म्हणाल्या.

धर्मेंद्रला बिर्याणी खूप आवडायची. तो दिलीप कुमार यांना भेटायला यायचा, तेव्हा आमच्या घरी तोच बेत असायचा. कौटुंबिक सल्ला घेण्यासाठी धर्मेंद्र दिलीप कुमार यांच्याशी वारंवार चर्चा करत असत. सनी देओल याचे पदार्पण असो वा बॉबी देओलचे, दोन्ही वेळेला चित्रपटाच्या मुहूर्ताला दिलीप कुमार सेटवर गेले होते, अशा आठवणींना सायरा बानू यांनी साश्रुनयनाने उजाळा दिला.

फ्रंटियर मेल माता मला मुंबईला घेऊन जा

नवी दिल्ली : फ्रंटियर मेलला ‘मला मुंबईला घेऊन जा’ अशी प्रार्थना करणाऱ्या धर्मेंद्रने कष्टाने आपले स्वप्न वास्तवात उतरवले. लोकप्रियतेच्या मोठ्या शिखरावर पोहोचूनही धर्मेंद्र स्वत:चे सहनेवाल गाव, तेथील शेते, खेळाची मैदाने आणि रेल्व पूल विसरू शकला नाही. २०१३ मध्ये दूरचित्रवाणीवरील एका मुलाखतीत धर्मेंद्र याने ‘मी शरीराने मुंबईत असलो, तरी मनाने पंजाबमधील गावातच असतो’ असे म्हटले होते.

खेळून झाले की आम्ही रेल्वे पुलावर तासनतास बसायला जायचो. मला खूप आवडायचे ते रेल्वे स्टेशन आणि तो पूल. रात्री अकरा वाजता तेथून फ्रंटियर मेल जायची. घरी असताना मी गाडीचा आवाज ऐकण्यासाठी आतुर व्हायचो. गाडी आल्यावर म्हणायचो, हे फ्रंटियर मेल माता, प्लीज मला मुंबईला घेऊन जा. माझी ती प्रार्थना फ्रंटियर मेल माता आणि देवाने खरोखरीच ऐकली, असे म्हटले होते, असे या मुलाखतीत त्याने सांगितले होते.

चित्रीकरणाचे काही काम नसले की धर्मेंद्र लोणावळा येथील फार्महाऊसवर जायचा आणि तेथे शेतीची कामे करायचा. तेथे झाडाखाली गावाप्रमाणे खाटेवर विश्रांती घेत असे. तेथील शेतात सर्व प्रकारच्या भाज्या पिकवणे आणि त्याबाबत मित्रांना, लोकांना सांगणे त्याला खूप आवडायचे. धर्मेंद्र याने एका समाजमाध्यमावर म्हटले होते, चित्रपटांप्रमाणेच मला शेतीचेही व्यसन आहे. त्यात खूप आनंद मिळतो. तुम्ही पण एकदा प्रयत्न करून पाहा.

गावात जन्माला येतो तो खूप नशीबवान असतो. तेथील जीवनात कृत्रिमपणाचा लवलेश नसतो. झाडावर चढत तुम्ही मजबूत बनता. गावातल्या तलावात उंचावरून उड्या मारायचो. घरी कोणाला न सांगताच मी पोहायला शिकलो, असेही त्याने एका मुलाखतीत म्हटले होते.

निर्मात्यांकडून इक्कीसचे पोस्टर प्रसिद्ध

धर्मेंद्र यांची भूमिका असलेल्या ‘इक्कीस’ या अखेरच्या चित्रपटाचे निर्माते ‘मडोक फिल्म्स’ने या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. ‘मडोक’कडून धर्मेंद्र यांचा उल्लेख कालातीत थोर कलाकार असा केला आहे. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केलेला ‘इक्कीस’ २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. धर्मेंद्र यांनी या चित्रपटात ब्रिगेडियर एम. एल. खेत्रपाल यांची भूमिका केली आहे. एम. एल. खेत्रपाल यांचा मुलगा सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल हे देशातील परमवीरचक्र पुरस्कार मिळवलेले सर्वात तरुण लष्करी अधिकारी होते. चित्रपटात अरुण खेत्रपालची भूमिका अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने साकारली आहे.

दिलीपकुमार यांच्या घरात घुसखोरी!

धर्मेंद्र यांनी १९५८ मध्ये ‘फिल्मफेअर’ची टॅलेंट स्पर्धा जिंकून चित्रपटसृष्टीचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले खरे, पण त्यापूर्वी त्यांनी थेट अभिनेता दिलीपकुमार यांच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना साधारण १९५२ची. ‘द सबस्टन्स अँड द शॅडो’ या दिलीपकुमार यांच्या आत्मचरित्रामधील आठवणी या भागात धर्मेंद्र यांनी लिहिले की, “त्या वेळी मी दुसऱ्या वर्षाला शिकत असताना लुधियानाहून मुंबईला गेलो होतो. तेव्हा मी अभिनेता होण्याचे ठरवले नव्हते, पण मला दिलीपकुमारला नक्की भेटायचे होते. कोणत्या तरी अगम्य कारणामुळे आम्ही दोघे भावंडे आहोत, अशी मी कल्पना करू लागलो होतो. मी मुंबईत पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धाडस करून त्यांच्या बांद्रा येथील घरी गेलो. मला प्रवेशद्वारावर कोणीही थांबवले नाही. मी थेट त्यांच्या घरात घुसलो. एक लाकडी दरवाजा वर शयनगृहात जात होता. तिथेही मला कोणी थांबवले नाही आणि मी त्या पायऱ्या चढून वर गेलो आणि दिलीपकुमार यांच्या शयनगृहात गेलो. त्या वेळी ते कोचावर झोपले होते. कदाचित माझी चाहूल लागल्यामुळे ते जागे झाले. मला पाहून ते चकित झाले असावेत. एक पूर्णपणे अनोळखी व्यक्ती अतिशय भारावून जाऊन त्यांच्याकडे पाहत होती. त्यांनी नोकराला मोठ्याने हाक मारली आणि मी तिथून पळ काढला. पळताना आपला कोणी पाठलाग करत नाही ना ते एकदा मागे वळून पाहिले. पळत पळत मी एका कॅफेटेरियात जाऊन थांबलो आणि तिथे लस्सी मागवली.”

अल्प राजकीय कारकीर्द

धर्मेंद्र यांनी २००४ मध्ये राजस्थानच्या बिकानेर येथून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि त्यामध्ये ते विजयीही झाले. त्यांच्या निवडणूक प्रचाराला मतदारांची मोठी गर्दी होत असे. त्या निवडणुकीत धर्मेंद्र यांनी काँग्रेसच्या रामेश्वरलाल दुडी यांचा जवळपास ६० हजार मतांनी पराभव केला. त्यांनी खासदारकीचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. पण राजकारणात त्यांचे मन रमले नाही. संसदेतील क्वचितच उपस्थिती, सभागृहांमधील चर्चांमध्ये अल्प सहभाग या मुद्द्यांवरून त्यांच्यावर टीकाही झाली. शेवटी ‘अभिनेत्याने अभिनेताच राहावे,’ असे म्हणत त्यांनी अल्पशा राजकीय कारकिर्दीला रामराम केला. राजकारणामुळे आपल्या चाहत्यांमध्ये अकारण पक्षीय पातळीवर विभागणी होते, असे मत त्यांनी २००८ मध्ये ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते.

सर्वगुणसंपन्न अभिनेताशर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेत्री

धर्मेंद्र हे माणूस म्हणून सर्वार्थाने भिन्न होते. त्यांना मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे स्वभावात किंचितही फरक पडला नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या माणसाशी ते प्रेमाने वागले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वगुणसंपन्न अभिनेते म्हणून नावाजलेल्या धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे आलेल्या शारीरिक व्याधींशी लढताना अखेरचा श्वास घेतला.

लोकप्रिय नटामागे लपलेला एक अतिशय मनमिळाऊ, सगळ्यांना सांभाळून घेणारा, श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाशी तितक्याच मायेने वागणारा माणूस म्हणून धर्मेंद्र यांच्या खूप आठवणी आपल्या मनात आहेत. एक कलाकार म्हणून ते उत्तम आहेतच, पण सेटवरचे लोक असोत वा चाहत्यांची गर्दी… त्या गराड्यात मला कायम त्यांच्यातला प्रेमळ सहकारीच अनुभवायला मिळाला. ते कायम आपल्या तत्त्वांना, मुळांना धरून राहिले आणि ते नेहमी त्याविषयी खुलेपणाने बोलत. स्वत:शी सच्चेपणाने वागणारा आणि कायम मातीशी नाळ जोडून राहिलेला हा कलाकार कितीही लोकप्रिय कलाकार म्हणून नावारूपाला आला तरी त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही.

धर्मेंद्र हे नट म्हणून अतिशय हुशार होते, मात्र त्या काळी कदाचित विनोदी अभिनयासाठी कलाकाराला कोणी पुरस्कार देणार नाही, गंभीर भूमिकांनाच नेहमी पुरस्काराने गौरवले जाते, अशी काही चुकीची धारणा होती असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. तरीही धर्मेंद्र यांनी मीना कुमारी यांच्याबरोबर ‘मजली दीदी’, जया बच्चन यांच्याबरोबर ‘गुड्डी’ आणि सायरा बानो यांच्याबरोबर ‘चैताली’ अशा त्यांच्या पडद्यावरच्या रूढ प्रतिमेच्या अगदी विरुद्ध विविधांगी भूमिका केल्या. हिंदी व्यावसायिक चित्रपटांत अगदी विरुद्ध टोकांच्या भूमिका करणारे धर्मेंद्र आपल्या चित्रपटांमध्ये मात्र वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या भूमिका करतात म्हणून हृषीकेश मुखर्जी कायम त्यांची फिरकी घेत.

‘तू धर्मेंद्र आहेस, तू बलदंड नायक आहेस हे सगळे विसर आणि इथे तू एक खूप चांगली भूमिका करतो आहेस’ हे लक्षात ठेव असे हृषीकेश मुखर्जी त्यांना कायम सांगत असत. ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ करत असताना मी दोन शिफ्टमध्ये काम करत होते. सकाळी ७ ते दुपारी २ मी वेगळ्या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते, तर दुपारी २ ते रात्री १० या वेळेत मी ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ हा चित्रपट करत होते. एकदा ‘छलका ये जाम’ या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते आणि दहा वाजून गेले तरी आमचे चित्रीकरण सरायचे नाव घेत नव्हते.

दिग्दर्शकाने मला दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितले, जेणेकरून चित्रीकरण पूर्ण होईल. मात्र धर्मेंद्र यांनी हे कसे शक्य आहे असे विचारत दुसऱ्या दिवशी ती सकाळी वेगळ्याच चित्रपटासाठी शिफ्ट करते आहे. आणि संध्याकाळी तिचे पती मन्सूर अली खान पतौडी यांचा कसोटी सामना असल्याने तिला कोलकत्त्याला जावे लागणार आहे, हे दिग्दर्शकाच्या लक्षात आणून दिले. अखेर मी धर्मेंद्र यांना आपण आजच उशिरापर्यंत चित्रीकरण गाणे पूर्ण केले तर चालेल का? असे विचारले आणि त्यांनीही पूर्ण सहकार्य करत ते चित्रीकरण पूर्ण केले. सकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही चित्रीकरण करत होतो. त्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य केले, तसे आणखी कोणी केले असते असे मला वाटत नाही. यातूनच ते इतरांपेक्षा खूप वेगळे होते हेच खरे.

धर्मेंद्रचे टॉप १० चित्रपट

धर्मेंद्र यांच्या ३००पेक्षा जास्त चित्रपटांमधून मोजक्या प्रभावी चित्रपटांची निवड करणे सोपे नाही. तरीही त्यांच्या पुढील १० चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय त्यांच्या कारकीर्दीचे वर्णन केले जाऊ शकत नाही.

१. शोले – धर्मेंद्र यांच्याच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहासही या ‘शोले’शिवाय पूर्ण होत नाही. रमेश सिप्पी दिग्दर्शित १९७५च्या या चित्रपटाची रसिकांवरील मोहिनी आजही कायम आहे. या चित्रपटाला एखाद्या दंतकथेचे स्थान मिळाले आहे.

२. चुपके चुपके – शोले प्रदर्शित झालेल्या १९७५मध्येच धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची जोडी ‘चुपके चुपके’द्वारे रसिकांच्या भेटीला आली. हृषीकेश मुखर्जींचे दिग्दर्शन आणि गुलजार यांचे संवाद लाभलेल्या हा नर्मविनोदी चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला.

३. अनुपमा – हृषीकेश मुखर्जींचा १९६६ सालचा हा चित्रपट नायिकाप्रधान होता. यामध्ये धर्मेंद्र आणि मुखर्जी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. पुढे या जोडीने मझली दीदी, गुड्डी आणि चैताली यांसारखे अनेकोत्तम चित्रपट दिले.

४. सत्यकाम – हा १९६९चा नाट्यपूर्ण चित्रपट नारायण सन्याल यांच्या याच नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित होता. याचेही दिग्दर्शन हृषीकेश मुखर्जी यांनी केले होते. या चित्रपटाला त्या वर्षीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

५. सीता और गीता -“शोले’आधी धर्मेंद्र आणि रमेश सिप्पी यांनी ‘सीता और गीता’साठी एकत्र काम केले होते. यामध्ये धर्मेंद्र आणि संजीवकुमार नायकांच्या भूमिकेत असले तरी खरी कथा हेमा मालिनीने साकारलेल्या दोन जुळ्या बहिणींभोवती फिरते.

६. यादों की बारात – नासिर हुसेन दिग्दर्शित या खास मसाला चित्रपटाने प्रचंड यश मिळवले. लहानपणी हरवलेली भावंडे हा फॉर्म्युला या चित्रपटापासून सुरू झाला. याचे संगीत आजही लोकप्रिय आहे.

७. प्रतिज्ञा – धर्मेंद्र यांनी या १९७५मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. ॲक्शन-कॉमेडी प्रकारच्या या चित्रपटातील ‘मैं जट यमला पगला दीवाना’ हे गाणे आजही स्मरणात आहे

८. धरम वीर – धर्मेंद्र आणि जितेंद्र यांनी यामध्ये जुळ्या भावंडांची भूमिका केली होती. लहानपणी हरवलेल्या भावंडांची गोष्ट हा नासिर हुसेन यांचा फॉर्म्युला पुढे मनमोहन देसाई यांनी भरपूर वापरला. धरम वीर हाही त्यापैकीच एक चित्रपट होता.

९. यमला पगला दिवाना आणि अपने – या चित्रपटांची निर्मिती ‘विजेयता फिल्म्स’ने केली होती. यामध्ये धर्मेंद्र यांनी सनी आणि बॉबी या आपल्या दोन्ही मुलांबरोबर भूमिका केली होती. यमला पगला दिवाना अनपेक्षितपणे हिट ठरला.

१०. रॉकी और रानी की प्रेम कहानी – करण जोहरने दिग्दर्शन केलेल्या या २०२३च्या चित्रपटात धर्मेंद्र यांनी अल्झायमर झालेल्या वृद्धाची भूमिका केली होती. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचे प्रेमसंबंध दाखवणारा प्रसंग चर्चेचा विषय ठरला होता.

लोकप्रिय संवादफेक!

धर्मेंद्र हे नाव उच्चारलं तरी अनेकांना आपोआपच ‘कुत्ते, कमीने’ हे शब्द ऐकू येतात. आपल्या दीर्घ कालावधीत त्यांनी अगणित संवाद म्हटले असतील. त्यापैकी काही संवाद विशेष लोकप्रिय झाले.

१. ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना’ – शोलेमधील हा अविस्मरणीय संवाद कोण विसरेल? दोरखंडांनी बांधलेल्या वीरुचे प्राण वाचवण्यासाठी नाच करावा, ही क्रूर गब्बरची अट ऐकू नकोस, अशी आपल्या प्रेयसीला संतापून सूचना करणारा हा संवाद खूप लोकप्रिय झाला.

२. ‘उमाजी, शायद अपने खुद को कभी हसते हुए नहीं देखा, कभी चुपके से आईने के सामने जाकर देखिए और देखिए यह हसी कितनी खूबसूरत है’ – शर्मिला टागोर यांनी रंगवलेली उमा ही अनुपमाची नायिका लहानपणापासून वडिलांच्या रागाचा सामना करावा लागल्यामुळे आत्मविश्वास हरवून बसली आहे. इतरांमध्ये फारशी न मिसळणाऱ्या उमाचा आत्मविश्वास परत मिळवून देण्यात कवी हृदयाचा अशोक मनापासून प्रयत्न करतो. अशा एका प्रसंगात शालीन नायिकेला तिच्या सौंदर्याची जाणीव करून देताना धर्मेंद्रचा सौम्यपणा लक्षात राहिला.

३. ‘कभी जमीन से बात की है ठाकूर? ये जमीन हमारी मां है’ – जे. पी. दत्ता यांच्या १९८५च्या गुलामीमधला हा संवाद खूप गाजला. यात धर्मेंद्रने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या क्रांतीकारकाची भूमिका केली होती.

४. ‘कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा’ – यादों की बारातमध्ये धर्मेंद्रच्या तोंडी असलेला हा संवाद पुढे अनेक चित्रपटांमध्ये विविध नायकांनी म्हटला.

५. ‘व्हेन आय डेड, पोलीस कमिंग… पोलीस कमिंग, बुढिया गोइंग जेल… इन जेल बुढिया चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग’ – वीरु आणि बसंतीच्या लग्नाचा प्रस्ताव न स्वीकारणाऱ्या मौसीला धडा शिकवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेला वीरु, चहा पित पित त्याची गंमत पाहणारा जय आणि चिंताक्रांत गाववाले, शोलेमधील हा संवाद अजरामर झाला आणि प्रसंगही. इतका की अजूनही गावात पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाइल आंदोलन करण्याची फॅशन रुढ आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे आणि कलाजगताचे भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आली. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.

धर्मेंद्र यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांनी स्वतःमागे सोडलेल्या वारशामुळे तरुण पिढ्यांना नेहमी प्रेरणा मिळत राहील. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

—-

भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका पर्वाचा अस्त झाला आहे. धर्मेंद्र महान कलाकार होते. त्यांनी प्रत्येक भूमिका उत्कृष्ट अभिनयाने साकारली. त्यांनी केलेल्या विविध भूमिकांमुळे असंख्य लोकांशी ते जोडले गेले होते. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

धर्मेंद्र यांनी सहा दशके चित्रपटरसिकांच्या हृदयावर राज्य केले. त्यांनी स्वतःची कधीही न पुसली जाणारी ओळख निर्माण केली. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

—-

भारतीय चित्रपटसृष्टीने एक अनमोल तारा गमावला आहे. त्यांनी अनेक दशके रसिकांचे प्रेम मिळवले. अतुलनीय अभिनय आणि साध्या जीवनाने त्यांनी रसिकांवर खोलवर छाप सोडली. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

—-

जवळपास सात दशकांच्या कारकीर्दीत धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीला मौल्यवान योगदान दिले. त्यांचे नेहमी आदर आणि प्रेमाने स्मरण होत राहील. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा

————————————————–

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्ग्ज अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झाले. त्यांना अनेकदा भेटण्याचा योग आला. त्यांचा उत्साह आणि विनोदबुद्धी ही खरोखरच वाखाणण्याजोगी होती. त्यांनी दिलेले योगदान इतके मोठे आहे की त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. धर्मेंद्रजी सदैव स्मरणात राहतील.- मधुर भांडारकर, चित्रपट निर्माते

————————————————-

धर्मेंद्रजी माणूस म्हणून फार उत्तम होते. चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाने त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. ते प्रत्येकाशी प्रेमानेच वागत. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. धर्मेद्रजी कायमच ‘एकमेवाद्वितीय’ राहतील. – करण जोहर, चित्रपट निर्माते

———————————————–

माझ्या पिढीच्या कळत्या वयात धर्मेंद्रजी प्रत्येक मुलाचे ‘हिरो’ होते आणि ते खरोखरच चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ होते. त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. धर्मेंद्रजी त्यांच्या चित्रपटांतून आणि त्यांनी सर्वांना दिलेल्या प्रेमातून सदैव स्मरणात राहतील. अक्षय कुमार</strong>, अभिनेते

———————————————

धर्मेंद्र यांनी लाखो प्रेक्षकांचा आदर आणि प्रेम मिळवले. त्यांचा वारसा हा चित्रपटांच्या पलीकडे जाणारा आहे. धर्मेंद्रजींच्या विलक्षण कर्तृत्वाचा आणि त्यांच्या नम्र तसेच प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचा चित्रपटसृष्टीवर कायमचा ठसा उमटला आहे. – माधुरी दीक्षित, अभिनेत्री