scorecardresearch

मुंबईः वेबमालिकेच्या नावाखाली अश्लील चित्रीकरण; अभिनेता-दिग्दर्शकाला अटक

तक्रारदार तरुणी मॉडेल असून तिने आतापर्यंत अनेक नामांकित कंपनीच्या जाहिरातीत काम केले आहे.

मुंबईः वेबमालिकेच्या नावाखाली अश्लील चित्रीकरण; अभिनेता-दिग्दर्शकाला अटक
photo source : लोकसत्ता डेस्क टीम

अश्लील चित्रीकरणाप्रकरणी चारकोप पोलिसांनी अभिनेता आणि दिग्दर्शक अनिरुद्ध झगडे याला शनिवारी अटक केली. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यात यास्मिन खान, अमीत पासवान आणि आदित्य यांचा समावेश आहे.

तक्रारदार तरुणी मॉडेल असून तिने आतापर्यंत अनेक नामांकित कंपनीच्या जाहिरातीत काम केले आहे. तिला मॉडलिंग क्षेत्रासह हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायचे होते. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे तिने तिची माहिती, छायाचित्रे तिच्या समाज माध्यम खात्यांवर अपलोड केली होती. ऑक्टोंबर २०२२ रोजी तिला एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून तो वेबमालिका निर्मिती करीत असून त्यासाठी तिला अभिनेत्री म्हणून घेण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले. मालिकेचा विषय बोल्ड असून  ती भारतात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. त्यावेळी तीे वेबमालिका भारतात प्रदर्शित होणार असल्याने तिने त्यास नकार दिला होता. काही दिवसांनी त्या व्यक्तीने तिला पुन्हा दूरध्वनी करुन वेबमालिका भारतात नाही तर विदेशात प्रदर्शित करणार आहोत, त्यामुळे तिने त्यात काम करावे अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करुन तिने वेबमालिकेमध्ये काम करण्यास होकार दिला होता. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला. या करारात तिला काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर तिला वेबमालिकेच्या चित्रीकरणासाठी कांदिवलीतील चारकोप परिसरातील आलीशान सदनिकेत बोलाविण्यात आले होते. तेथे तिच्यासह इतर चारजण होते. अनिरुद्ध या वेबमालिकेचा दिग्दर्शक तसेच अभिनेता होता. त्याच्यासह अमीत सहकलाकार होता तर यास्मिन ही चित्रीकरणाचे काम पाहत होती.

हेही वाचा >>>मुंबई: दुचाकीच्या धडकेने ५६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू ; दुचाकीस्वाराला अटक

त्यावेळी तिला कराराची धमकी देऊन तिचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले. घाबरलेली तरूणी चित्रीकरण संपल्यानंतर घरी निघून गेली. काही दिवसांनी तिला तिचे अश्लील चित्रीकरण एका खाजगी ॲपमध्ये प्रदर्शित झाल्याचे समजले. ते चित्रीकरण तिच्या एका नातेवाईकांनी पाहिल्यानंतर तिला विचारले. त्यावेळी तिला धक्का बसला. तिने अनिरुद्धसह इतर तिघांकडे याबाबत विचारणा केली. तसेच ती चित्रफीत काढून टाकण्याची विनंती केली. मात्र त्या चौघांनी चित्रफीत काढून टाकण्यासाठी तिच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. अखेर तिने याप्रकरणी चारकोप पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अनिरुद्ध झगडे, यास्मिन खान, अमीत पासवान आणि आदित्य या चौघांविरुद्ध विनयभंगासह खंडणी, फसवणूक, बदनामी करुन धमकी देणे यासह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी याप्रकरणी  दिग्दर्शक आणि अभिनेता अनिरुद्धला पोलिसांनी अटक केली. यास्मिन खान या महिलेने दिंडोशीतील विशेष सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. पोलिसांनी अॅपमधील तरूणीचे चित्रीकरण काढून टाकले आले. तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आरोपींविरुद्ध लवकरच ३७६ (लैगिंक अत्याचार) या कलमाची वाढ करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सागितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 16:15 IST

संबंधित बातम्या