मुंबई : ‘आपला देश हा इंद्रधनुष्य आहे, त्याचे रंग बदलण्याचा प्रयत्न करू नये. हे रंग कायम असेच राहू देत. या देशातील बाकीचे रंग वगळले तर काहीही उरणार नाही. आपल्या देशात सर्वच रंगांना वाव आहे,’ अशा स्पष्ट शब्दांत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांचा उल्लेख न करता आपल्या भावना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केल्या. नाटय़ आणि चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी त्यांना प्रतिष्ठित मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले.

७९वा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळा विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात बुधवारी झाला. यावेळी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर हा खूप महत्वाचा पुरस्कार आहे. इतक्या वर्षांची वाटचाल करून आपण इथवर पोहोचलो आहोत असे वाटतच नाही, उलट मी पुन्हा सुरुवात करतो आहे, असेच वाटते आहे. यशापयशाला आपण एकटे जबाबदार नसतो तर आजूबाजूची मंडळीही असतात त्यामुळे हा पुरस्कार केवळ माझा नाही, तर आजवरच्या प्रवासात साथ दिलेल्या सर्वाचा आहे’, अशी भावना पाटेकर यांनी व्यक्त केली. गेले दीड वर्ष करोनामुळे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता. यावर्षी झालेल्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळय़ात प्रदीर्घ पत्रकारितेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराने खासदार संजय राऊत यांना सन्मानित करण्यात आले. ‘मराठी पत्रकारितेला फार मोठी परंपरा आहे. माझा आजही छापील शब्दावर विश्वास आहे. छापील शब्दांत क्रांती करण्याची, सत्ता उलथवण्याची, सत्ता आणण्याची ताकद आहे’, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. चित्रपट क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कवयित्री नीरजा यांना  कविता आणि साहित्यातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले.  ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका-संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रख्यात अभिनेते प्रेम चोप्रा यांना चित्रपट क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल पुरस्कार देण्यात आला.