मुंबई : अभिनेता रणवीर सिंगविरोधात घेण्यात आलेला असहकाराचा निर्णय मागे घेत असल्याचे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने (एफडब्ल्यूआयसीई) बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. ‘डॉन ३’ चित्रपटातून ऐनवेळी माघार घेतल्याप्रकरणी चित्रपटाचे निर्माते एक्सेल एन्टरटेन्मेट आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यामध्ये सुरू झालेला वाद हा चित्रपटसृष्टीतील निर्माते, तंत्रज्ञ-कलाकारांच्या सगळ्या मुख्य संघटनांनी एकत्र येऊन सोडवावा, ही फेडरेशनची मागणी इम्पा आणि प्रोड्युसर्स गिल्डनेही उचलून धरली असून त्यांच्याचकडून आलेल्या विनंतीवरून हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे फेडरेशनचे प्रमुख सल्लागार अशोक पंडित यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात अभिनेता रणवीर सिंग विरोधात असहकार पुकारण्याचा निर्णय ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने (एफडब्ल्यूआयसीई) जाहीर केला होता. ‘डॉन ३’ चित्रपटातून रणवीरने ऐनवेळी माघार घेतल्याने आपल्या एक्सेल एन्टरटेन्मेट या निर्मितीसंस्थेच्या झालेल्या नुकसान प्रकरणी फरहान अख्तरने फेडरेशनकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत अभिनेता रणवीर सिंगने या प्रकरणी आपली बाजू मांडावी, असे आवाहन फेडरेशनच्या वतीने करण्यात आले होते.
मात्र, रणवीरने कुठलीही दाद दिली नाही, उलट हे प्रकरण कायदेशीररित्या फेडरेशनच्या अखत्यारित येत नाही, अशा आशयाचे पत्र त्याने दिले. त्यामुळे त्याच्या विरोधात भूमिका घेत फेडरेशनचे चार लाखांहून अधिक तंत्रज्ञ-कलाकार हा वाद संपेस्तोवर रणवीरबरोबर काम करणार नाहीत, असे जाहीर करण्यात आले होते.
या प्रकरणी ‘इम्पा’ (इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन) आणि प्रोड्युसर्स गिल्ड या निर्मात्यांच्या दोन्ही सर्वोच्च संघटनांनी रणवीरने ऐनवेळी चित्रपटातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र, चित्रपट व्यवसायातील तंत्रज्ञ-कलाकार सगळ्यांचे हित लक्षात घेत रणवीरविरोधातील असहकाराचा निर्णय फेडरेशनने मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी केल्याची माहिती अशोक पंडित यांनी दिली. या विनंतीची दखल घेत फेडरेशन हा निर्णय मागे घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी, सचिव अशोक दुबे यांच्यासह ‘सिन्टा’ या चित्रपट कलाकार संघटनेच्या सचिव उपासना सिंगही उपस्थित होत्या. रणवीर ‘सिन्टा’चा सदस्य असून त्यालाही या प्रकरणात फटका बसू नये, यासाठी आम्ही सहकार्य करू, असे उपासना सिंग यांनी सांगितले.
रणवीर सिंगकडून कायदेशीर नोटीस
फेडरेशनने पुकारलेल्या असहकाराविरोधात रणवीर सिंग आणि निर्माते टी. पी. अगरवाल दोघांनीही कायदेशीर नोटीस पाठवल्या असून त्याला फेडरेशनकडून उत्तर दिले जाईल, असेही पंडित यांनी यावेळी स्पष्ट केले.
