मुंबई : ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यात अभिनेता संजय दत्त याने केलेल्या मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याची समाजमाध्यमांवर चर्चा सुरू असतानाच त्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे. “प्रताप भाई, जय महाराष्ट्र…” अशी मराठीतून सुरुवात करत संजय दत्तने दहीहंडीतील आपले वक्तव्य केवळ मस्करीच्या स्वरूपात होते, असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते.

संस्कृती युवा प्रतिष्ठानची ठाण्यातील दहीहंडी महाराष्ट्रातील नामांकित दहीहंडींपैकी एक मानली जाते. यंदाच्या सोहळ्याला संजय दत्त यांच्यासह सुनील शेट्टी, क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मराठी भाषेच्या वापराबाबत आग्रही भूमिका घेणाऱ्या सरनाईक यांच्या उपस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मराठीत संवाद साधला.
संजय दत्तने कार्यक्रमात “प्रताप भाई, मी सहा वर्षे येरवडा तुरुंगात राहूनही मला मराठी शिकता आले नाही,” असे मिश्कीलपणे म्हटले होते. या वक्तव्याची समाजमाध्यमांवर चर्चा झाली. काहींनी त्यावर टीका करत मराठी शिकण्याची जबाबदारी केवळ रिक्षा आणि टॅक्सीचालकांचीच आहे का, असा सवालही उपस्थित केला.

या पार्श्वभूमीवर संजय दत्तने सरनाईक यांना फोन करून आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते. “मला चांगली मराठी येते. माझ्या बोलण्यामुळे चुकीचा संदेश गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे कुटुंबीय मुंबईकर आहेत. मी याच मातीत वाढलो असून महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे,” असे त्याने सांगितल्याची माहिती आहे.

या संवादादरम्यान संजय दत्तने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. कठीण काळात बाळासाहेब ठाकरे यांनी आपण आणि आपल्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आधार दिल्याचेही त्याने नमूद केल्याचे समजते.