मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी आणि अभिनेता संजय दत्त याच्या पॅरोलमध्ये मंगळवारी आणखी एक महिन्याची वाढ करण्यात आली. पत्नी मान्यताच्या आजारपणामुले पॅरोलमध्ये वाढ करण्याची मागणी संजय दत्त याने राज्य सरकारकडे केली होती. ती मंजूर करण्यात आली. संजय दत्तला २१ मार्चपर्यंत पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी गेल्या वर्षी येरवडा तुरुंगात दाखल झाल्यापासून संजय दत्त सातत्याने तुरुंगाबाहेर राहात आहे. सुरुवातीला फर्लो आणि नंतर पॅरोल या दोन रजांचा वापर करून संजय दत्त सुमारे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगाबाहेर आहे. मान्यताच्या आजारपणाच्या कारणामुळे संजय दत्तने पॅरोलमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. संजय दत्तला अद्याप एकूण साडेतीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगायची आहे.