हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने घराघरांत पोहोचलेले अष्टपैलू अभिनेते म्हणून सयाजी शिंदे यांना ओळखले जाते. सयाजी शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलताना दिसत आहे. एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडियाद्वारे प्रत्येकाला वृक्षतोड आणि वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करताना दिसतात. नुकतंच मुंबईतील सायन रुग्णालयात वृक्षतोड होणार असल्याचे समजताच सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील प्रसिद्ध सायन रुग्णालयात तब्बल १५८ झाडे तोडण्यात येणार आहेत. रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी ही झाडे तोडली जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे. यातील दोन झाडे नुकतंच तोडण्यातही आली आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण समजताच अभिनेते सयाजी शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतंच याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. “ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

या व्हिडीओत त्यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “ही अत्यंत वाईट बातमी आहे की सायन रुग्णालयात डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी १५८ झाडे कापण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील दोन झाडे कापण्यात आली आहेत. इतर झाडांवर नंबर पडले आहे. एखाद्या यमाने किंवा दहशतवाद्याने सांगावं की ही १५८ माणसं आम्ही मारणार आहोत, तसं या झाडांवर बॉम्ब टाकल्यासारखं होणार आहे. त्या झाडावर असणार पशूपक्षींचा संसार नष्ट होणार आहे.”

“तर ही परवानगी का दिली? ही वृक्षतोड टाळता येऊ शकते का? ही झाडं वाचू शकतात का? याचा विचार व्हायला हवा. कारण करोनाकाळात आपण विकत ऑक्सिजन घेतला तसा सिलेंडरनेच ऑक्सिजन घ्यायचा का? चांगली झाडं जी कार्बनडायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन देतात, पशू पक्षांची घरं असलेली ती झाडं का कापायची? कृपया ती झाडे वाचवा” असे सयाजी शिंदे यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

सध्या त्यांचा हा व्हिडीओ आणि ही पोस्ट चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावर अनेकांनी कमेंट करत आपपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी या वृक्षतोडीसाठी विरोधही केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sayaji shinde opposed to cut down 158 trees in mumbai sion hospital nrp
First published on: 06-05-2022 at 09:28 IST