यश राज फिल्मकडून करारांची कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

सुशांत गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्यासोबत झालेल्या व्यावसायिक करारांची कागदपत्रे यश राज फिल्मने तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहेत. सुशांतसिंह याने व्यावसायिक तणावातून आत्महत्या केली का? याचा शोध मुंबई पोलीस घेत आहे. त्यादृष्टीने सुशांतसिंहबरोबर झालेल्या करारांची माहिती पोलिसांनी यश राज फिल्मकडे गुरुवारी मागितली होती. तसेच अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या व्यवस्थापकांचे जबाब नोंदवून घेत त्याची चौकशी केली.

सुशांतसिंह याने रविवारी वांद्रे येथील घरात आत्महत्या केली होती. सुशांतसिंह याने कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात सुशांतचे नातेवाईक, मित्र, कर्मचारी, सहकारी आदी सुमारे १५ जणांचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. सुशांतसिंह याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचा जबाब गुरुवारी नोंदविला होता. त्यात सुशांतसंबंधित व्यावसायिक गोष्टींचा तिने उल्लेख केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor sushant singh rajput suicide case contract documents from yash raj film handed over to police abn