टायगर श्रॉफवर हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच अभिनेता तुषार कपूरला खंडणीसाठी धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. हॅरी बॉक्सर नावाच्या गँगस्टरने तुषारकडे ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
ही धमकी हॅरी बॉक्सर नाव असल्याचा दावा करणाऱ्या गँगस्टरने दिली आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा आणि हॅरी बॉक्सरचा आवाज पडताळून पाहिला. मात्र त्यात साधर्म्य नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर कलाकारांमध्ये भीतीचं, चिंतेचं वातावरण आहे. याचा फायदा कुणीतरी घेत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
बॉक्सर हा बिश्नोई गँगचास सदस्य असून त्याने यापूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता रणवीर सिंग यांना धमकी दिल्या असून, त्याप्रकरणी त्याच्या नावावर गुन्हे दाखल आहेत.
१८ ऑक्टोबर २०२६ रोजी जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली आहे. नुकतीच हरियाणातून १२ व्या आरोपीला (अमर मुंडिया) अटक करण्यात आली असून त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात वापरलेली पिस्तुले व काडतुसे सुरत, गुजरात येथून जप्त करण्यात आली आहेत. तसेच इंदूर आणि दिल्लीतून शस्त्र पुरवठा करणारे आणि इतर संशयितांना अटक केली गेली आहे. हल्ल्यामागील नेमका हेतू, आर्थिक व्यवहार आणि सूत्रधारांचा शोध गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.
