मुंबई: अभिनेता वरुण धवन त्याच्या मेट्रो प्रवासामुळे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. याआधी एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मुंबई मेट्रोत वडापाव खाणारा वरुण धवन टोलर्सच्या निशाण्यावर आला होता. आता वरुण धवनने मेट्रो प्रवासादरम्यान नियमांचे उल्लंघन केले आहे. आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवनने नुकताच मुंबई मेट्रोमधून प्रवास केला. यावेळी तो मेट्रो गाडीत हॅन्डला लटकताना,स्टंट करताना दिसला.
मेट्रो प्रवासादरम्यान अशी कृत्य करणे नियमांचे उल्लंघन असून याविरोधात कडक कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वरुण धवनविरोधात कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वरुण धवन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी २०२५ मध्ये आपल्या जुग जुग जिओ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई मेट्रोमधऊन प्रवास केला होता. यावेळी ते दोघेही मेट्रोत वडापाव खाताना दिसले होते. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरला होता. त्यानंतर वरुण आणि कियारा दोघेही टोलर्सच्या निशाण्यावर आले होते. मेट्रो गाडीत काहीही खाण्यास सक्त मनाई असताना सेलिब्रिटींना वडापाव खाण्यास मुभा आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता. या घटनेनंतर आता वरुण धवन पुन्हा एकदा मेट्रोमुळे वादाच्या भोवर्यात अडकण्याची शक्यता आहे.
वरुण धवनचा बाॅर्डर २ सिनेमाचे नुकताच प्रदर्शित झाला आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनाठी दोन-तीन दिवसांपूर्वी एका चित्रपटगृहात अतिजलद पोहचण्यासाठी वरुण धवनने मेट्रोचा पर्याय स्वीकारला. मेट्रोमधून प्रवास करताना त्याने प्रवाशांशी संवाद साधला. तर तो मेट्रो गाडीत स्टंट करतानाही दिसला. मेट्रो गाडीतील हॅन्डलला लटकतानाचा त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
मेट्रोत गाडीत लटकतानाच्या वरुण धवनच्या व्हिडिओची गंभीर दखल एमएमआरडीएने घेतली आहे. मेट्रोदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत एमएमआरडीएने एक्सवर एक पोस्ट टाकली आहे. मेट्रो गाडीतील हँडल लटकण्यासाठी नाहीत. अशी कृत्य मेट्रो रेल्वे (संचालन आणि देखभाल) अधिनियम २००२ मध्ये दिलेल्या सार्वजनिक उपद्रव आणि मालमत्तेचे नुकसान करण्याशी संबंधित आहे. हा दंडनीय गुन्हा असून यात तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तर कोणीही मेट्रो प्रवासादरम्यान अशी कृत्ये करु नये असे आवाहनही या पोस्टद्वारे करण्यात आले आहे.
या पोस्टनंतर वरुण धवनविरोधात एमएमआरडीए कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याविषयी एमएमआरडीएतील अधिकार्यांना विचारले असता त्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. मात्र सूत्रांकडून मिळणार्या माहितीनुसार याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.
