महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हणजेच FDA ने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिरात प्रकरणात कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. विमल पान मसाल्यावर राज्यात बंदी आहे तरीही ही जाहिरात कशी काय केली? यावर FDA ने तिन्ही अभिनेत्यांकडे उत्तर मागितलं आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या त्यांच्या धाडींसाठी आणि धडक कारवाईसाठी चर्चेत आहेत. त्यांच्याच विभागाने जी स्क्रुटिनी केली त्यानंतर या तीन अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
तिन्ही अभिनेत्यांना नोटीस का बजावण्यात आली?
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/ इलायची’चा प्रचार केल्याबद्दल या तिघांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. २०२४ मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे तीन अभिनेते एकत्र आले होते. या तिघांना ‘विमल पान मसाला/ इलायची’च्या जाहिरातीतील सहभाग तातडीने थांबवण्याचे आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल, वेबसाइटवरून जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कलाकारांवर कायदेशीर कारवाई का करू नये, याचं सविस्तर लेखी स्पष्टीकरण १५ दिवसांच्या आत सादर करा हे बजावत ही नोटीस दिली आहे.
१५ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश
एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंढे हे धडक कारवाई करत आहेत. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीवरही एफडीएनं अनेक ठिकाणी छापे टाकले होते. तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावर एफडीएनं कारवाई तीव्र केल्यामुळे शाहरुख, अजय देवगण आणि टायगर हे चौकशीच्या वर्तुळात सापडले आहेत. या तिघांनी मिळून केलेल्या जाहिरातीमुळे विमल पान मसाला ब्रँडशी संबंध निर्माण होतो आणि हे त्याचं अप्रत्यक्ष प्रमोशन ठरू शकतं, असं एफडीएनं त्यांच्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे. FDA ने याबाबत कारवाई करत अजय देवगणच्या जुहू इथल्या निवासस्थानी, शाहरुख खानच्या वांद्रे इथल्या मन्नत या निवासस्थानी आणि टायगरला त्याच्या टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स एलएलपी या प्रॉडक्शन हाऊसच्या पत्त्यावर कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. १५ दिवसांच्या आत या प्रकरणी उत्तर द्या असंही FDA ने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
बोलो जुबाँ केसरी म्हणणं अंगाशी
शाहरुख खान, अजय देवण आणि टायगर श्रॉफ या तिन्ही सेलिब्रिटींची बोलो जुबाँ केसरी म्हणत केलेली जाहिरात चांगलीच प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीचे सोशल मीडियावर मीम्सही तयार झाले होते. मात्र जाहिरातीत बोलो जुबाँ केसरी म्हणणंच या तिघांच्या अंगाशी आलं आहे. कारण विमल इलायची जाहिरात प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या तिन्ही नटांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
