मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी पुन्हा चौकशी केली. साडेचार तासांच्या चौकशीनंतर अनन्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. त्यावेळी अनन्याचे वडील अभिनेते चंकी पांडेदेखील होते. सोमवारी पुन्हा अनन्याला याप्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. तिचा मोबाइलही एनसीबीने ताब्यात घेतला आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य एका महिला अधिकाऱ्याने अनन्याची चौकशी केली. अडीच वाजण्याच्या सुमारास अनन्या एनसीबी कार्यालयात दाखल झाली. एनसीबीने त्यांच्याकडील माहितीची पडताळणी अनन्याकडून केली. त्यासाठी तिला एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले होते. साधारणत: साडेतीन ते चार तास ही चौकशी चालली. याप्रकरणी आर्यनच्या संपर्कात असलेल्या आणखी व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे. अनन्याला एनसीबीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. त्यावेळी तिच्याकडून उर्वरित माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात याप्रकरणी आणखी दोन व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ संदेशांचा एनसीबीकडून चुकीचा अर्थ!

आपल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ संदेशांचा एनसीबीने चुकीचा अर्थ लावला असून ते अन्यायकारक असल्याचा दावा आर्यन याने उच्च न्यायालयाकडे जामिनाची मागणी करताना केला आहे. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यनने उच्च न्यायालयात धाव घेत जामिनाची मागणी के ली आहे. संदेशांतून कोणतीही गुप्त माहिती मिळालेली नाही, असा दावा आर्यनने केला आहे.