मुंबई : सिने अभिनेत्री करिन कपूर आणि अमृता अरोरा यांना करोनाची बाधा झाली असून त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सात दिवसांनी त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोघींच्या सदनिका टाळेबंद करण्यात आल्या असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ३० जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
ओमायक्रॉन विषाणूमुळे पालिकेची यंत्रणा दक्ष झाली आहे. त्यातही उच्चभ्रू वर्गाकडून मात्र करोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. बॉलिवूडमधील सिने कलाकारांच्या पाट्र्यांमध्ये करोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यातच या दोन अभिनेत्रींना करोना झाला असून त्या काही पाट्र्यांमध्ये सहभागी झाल्या होत्या असे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांनी करोनाचा प्रसार केला असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या दोघींनी अनेक ख्रिसमसपूर्व पाट्र्यांना हजेरी लावली आहे. या दोघींना करोना झाल्याने आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध मुंबई महापालिका घेत आहे. सध्या दोघीही गृह विलगीकरणात असून महापालिकेने या दोघींच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकी १५ ते २० जणांची कोरोना चाचणी केली असून त्याचे अहवाल मंगळवारी अपेक्षित आहेत.
‘कार्यक्रमांना परवानगी देताना काळजी घ्या’
कोरोना नियंत्रणात आल्यामुळे कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीत परवानगी दिली जात असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी समारंभात करोना नियम पायदळी तुडवले जातात. त्यात ओमायक्रॉनचा धोका वाढलेला असताना कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी देताना काळजी घ्या, असे निर्देश किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिले.
मुंबईतील ग्रँट हयात हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी गर्दी केल्याचा एका व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. शिवाय दोन अभिनेत्रींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.