मुंबई : समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी त्यांना पाठबळ मिळावे या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाची सुरुवात केली. लक्षावधी वाचक दानयज्ञाद्वारे राज्यातील विविध संस्थांच्या कार्याला उभारी देत असतात. या संस्था आणि त्यांच्या विधायक कार्यात आपलाही खारीचा वाटा उचलू पाहणाऱ्या अशा दानशूरांमधील दुवा सांधणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या दानयज्ञाचा सांगता सोहळा २७ जानेवारीला होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वरूप संपत रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून ११ संस्थांचा परिचय वाचकांना करून देण्यात आला होता. ‘लोकसत्ता’च्या दानशूर वाचकांनी या संस्थांना भरभरून आर्थिक पाठबळ दिले. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध क्षेत्रातून प्रचंड जिद्दीने, मेहनतीने सामाजिक कार्य उभारणाऱ्या या संस्थांचे कार्य आणि ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून लोकांनी दिलेला पाठिंबा असा सामाजिक बंध जपणारा सोहळा रसिकांना अनुभवता येणार आहे.

एकेकाळी हिंदीचा रुपेरी पडदा गाजवलेल्या आणि त्यानंतर ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी विविध प्रकारे कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वरूप संपत रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’चा सांगता सोहळा होणार आहे. मंगळवार, २७ जानेवारी रोजी होणाऱ्या या दानयज्ञ सांगता सोहळ्यात अनेकांनी केलेले आर्थिक दान त्या त्या संस्थांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

उपक्रमातील संस्था

आभा परिवर्तनवादी संस्था, मुंबई</p>

आधार मतिमंद निवासी विद्यालय, सोलापूर

एकलव्य’ संस्था

‘विज्ञानवाहिनी’ फिरती प्रयोगशाळा

आवाज व्हॉइस ऑफ स्ट्रे अॅनिमल्स, मुंबई

मनोदय ट्रस्ट आणि मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर, डोंबिवली

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय

स्नेह सावली संस्था, छत्रपती संभाजीनगर

यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट

आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी’ आश्रयालय

उचल फाऊंडेशन

कधी : २७ जानेवारी

वेळ : सायंकाळी ४ वाजता

कुठे : करिश्मा हॉल, पी. एल. देशपांडे बँक्वेट्स बाय ऑल सीझन्स, ५वा मजला, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी