|| शैलजा तिवले
वैद्यकीय शिक्षण विभागाचा अभ्यास
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाने म्युकरमायकोसिस रुग्णांच्या २४२ मृत्यूंचा विश्लेषणात्मक अभ्यास केला असून त्यात मधुमेहाची तीव्रता अधिक असलेल्या आणि करोना उपचारांत प्रतिजैविके व प्राणवायूची आवश्यकता भासलेल्या रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. राज्यातील एकूण आकडेवारीनुसार म्युकरमायकोसिसच्या १३ टक्के  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या म्युकरमायकोसिस रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण १६ टक्के आढळले आहे.

राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत २३ ऑगस्टपर्यंत १८,०५७ रुग्णांची म्युकरमायकोसिसची तपासणी करण्यात आली. यातील २,८७६ रुग्णांना उपचारांसाठी दाखल केले आहे. यातील ७५ टक्के- म्हणजेच २,१५९ रुग्ण बरे झाले आहेत, तर १६ टक्के- ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृतांपैकी २४२ रुग्णांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला आहे. शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांपैकी ७६ टक्के  रुग्णांवर शस्त्रक्रिया करून काळी बुरशी काढावी लागली आहे.

राज्यभरात म्युकरमायकोसिसची बाधा १० हजार ८८ रुग्णांना झाली असून यातील १३ टक्के(१,३२५) रुग्णांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबईत नोंदले आहेत.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अभ्यासानुसार मृतांपैकी सुमारे ६३ टक्के रुग्ण हे ५० वर्षांवरील आहेत, त्यात सर्वाधिक- ६८ टक्के पुरुष आहेत. मृतांपैकी ९३ टक्के रुग्णांना करोनाची बाधा झाली होती. यात प्रामुख्याने ७८ टक्के रुग्णांना मधुमेह असल्याचे आढळले. म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झालेले रुग्ण करोनाच्या उपचारांसाठी सरासरी नऊ दिवस रुग्णालयात दाखल होते. यातील सुमारे ७५ टक्के रुग्णांना प्रतिजैविके तर ८१ टक्के रुग्णांना प्राणवायू देण्यात आला होता. यातील ३९ टक्के रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होते. म्युकरमायकोसिसच्या रुग्णाची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली असली तरी सध्या १,७४१ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

औषधांचा वापर योग्य होणे गरजेचे…

‘‘करोनाच्या विषाणूमुळे रुग्णाच्या शरीरातील मधुमेहाची पातळी अचानकपणे वाढल्यास म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असतो. परंतु ही बाब लक्षात आल्यावर आता रुग्णांमधील मधुमेह नियंत्रित ठेवण्यावर काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. परंतु आता करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये हा धोका पुन्हा वाढायला नको यासाठी प्रतिजैविकांसह अन्य औषधांचा वापर विचारपूर्वक व योग्य रीतीने होणे गरजेचे आहे,’’ असे मत कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि करोना कृती दलाचे सदस्य डॉ. अशेष भूमकर यांनी व्यक्त केले.

कोणत्या अवयवांवर परिणाम?

म्युकरमायकोसिसच्या मृतांपैकी २१९ रुग्णांच्या कोणत्या अवयवांवर अधिक परिणाम झाला, याचा अभ्यासही वैद्यकीय शिक्षण विभागाने केला असून यात सर्वाधिक- म्हणजे ९८ टक्के मृतांमध्ये सायनसवर परिणाम झाल्याचे आढळले आहे. याखालोखाल ६५ टक्के रुग्णांमध्ये डोळ्यांवर, ३२ टक्के रुग्णांत तोंडामध्ये, तर ११ टक्के रुग्णांमध्ये फुप्फुसांवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.