मुंबई : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि टाटा समूहाची द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड यांच्यात चार शहरांमधील विमानतळांवर आठ हॉटेल्स विकसित करण्यासाठी एक महत्त्वाचा करार झाला आहे. मुंबई, अहमदाबाद, लखनौ आणि गुवाहाटी येथे २ हजारांहून अधिक खोल्या असलेली आठ हॉटेल्स बांधण्यात येणार आहेत. ही हॉटेल्स ताज, विवान्ता, गेटवे आणि जिंजर या ब्रँड्सअंतर्गत कार्यरत असतील.

अदानी एअरपोर्ट्सने सात राज्यांमधील आठ विमानतळांवर ६५५ एकरांहून अधिक जमिनीचा विकास करण्यासाठी अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेडची स्थापना केली आहे. यामध्ये मुंबई आणि नवी मुंबईतील जवळपास ४४० एकर जमिनीचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेड मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, जयपूर आणि गुवाहाटी येथे सुमारे २.२ कोटी चौरस फूट क्षेत्र विकसित करण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे.

या हॉटेल्सचा समावेश

करारात तीन ताज, दोन विवान्ता, एक गेटवे आणि दोन जिंजर हॉटेल्सचा समावेश आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ येथे एक ताज हॉटेल उभारण्यात येणार आहे. लखनौमध्ये, एक विवान्ता आणि एक जिंजर हॉटेल असेल. अहमदाबादमध्ये, एक ताज आणि एक गेटवे हॉटेल तर गुवाहाटीमध्ये एक ताज, एक गेटवे आणि एक जिंजर हॉटेल असेल. एकूणच, २ हजारांहून अधिक खोल्या हॉटेल्समध्ये असतील.

विकासासाठी प्रेरक ठरणारी एकात्मिक ठिकाणे

जगभरातील आघाडीची विमानतळे व्यापार, पर्यटन आणि शहरी विकासासाठी प्रेरक ठरणारी एकात्मिक ठिकाणे म्हणून विकसित होत आहेत. या माध्यमातून आतिथ्य क्षेत्रावर आधारित बहुउपयोगी विकास क्षेत्रे आणि भारतातील आघाडीची आतिथ्य क्षेत्रातील कंपनी एकत्र येत आहेत. ताज या प्रतिष्ठित ब्रँडसह विविध ब्रँड्सच्या माध्यमातून प्रमुख विमानतळ शहरांमध्ये जागतिक दर्जाची हॉटेल्स निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.-जीत अदानी, संचालक, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड

पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याचे उद्दिष्ट

भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक म्हणून आपले स्थान मजबूत करत असताना, विमानतळ-केंद्रित विकास प्रकल्प महत्त्वाची व्यावसायिक आणि आतिथ्य केंद्रे म्हणून उदयास येत आहेत. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडसोबतची भागीदारी दोन आघाडीच्या भारतीय कंपन्यांना एकत्र आणते. भारतातील प्रवास आणि पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे.- पुनीत छटवाल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी , द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड.