Adani application power distribution Navi Mumbai Privatization power sector Maharashtra ysh 95 | Loksatta

नवी मुंबईत वीज वितरण परवान्यासाठी ‘अदानी’चा अर्ज; महाराष्ट्रात वीज क्षेत्रात खासगीकरण पर्वाची चाहूल

मुंबई उपनगरातील रिलायन्सचा वीज वितरण व्यवसाय ताब्यात घेऊन चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. विस्ताराचे वेध लागले आहेत.

नवी मुंबईत वीज वितरण परवान्यासाठी ‘अदानी’चा अर्ज; महाराष्ट्रात वीज क्षेत्रात खासगीकरण पर्वाची चाहूल
नवी मुंबईत वीज वितरण परवान्यासाठी ‘अदानी’चा अर्ज

सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : मुंबई उपनगरातील वीज वितरण व्यवसायात जम बसवल्यानंतर महाराष्ट्रात महावितरणच्या परिसरात विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या अदानी समूहाने नवी मुंबई महानगरपालिका आणि लगतच्या परिसरात वीज वितरणाचा समांतर परवाना मागण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. अदानीचे हे सीमोल्लंघन महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात खासगीकरणाचे पर्व सुरू करण्यासाठीचे पहिले पाऊल मानले जात आहे. नवी मुंबईचा परिसर हा महावितरणला घसघशीत महसूल देणाऱ्या राज्यातील निवडक परिसरांपैकी एक आहे. शिवाय भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात विकास होणार आहे. त्यामुळेच अदानीने महाराष्ट्रात आपला वीज व्यवसाय विस्तारण्यासाठी सर्वप्रथम नवी मुंबईची निवड केली आहे.

मुंबई उपनगरातील रिलायन्सचा वीज वितरण व्यवसाय ताब्यात घेऊन चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. विस्ताराचे वेध लागले आहेत. मुंबई उपनगराच्या पलीकडे इतर भागांत वीज वितरण व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना अदानीने आखली असून केंद्रीय वीज कायद्यातील दुरुस्ती काही कारणांनी रखडली तरी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गाचा उपयोग करून नव्या भागांत विस्तारीकरण करण्याचा अदानी समूहाचा मानस असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ३१ ऑगस्टला दिले होते. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.चे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल यांनी वीज वितरण व्यवसाय विस्ताराच्या आकांक्षांचे संकेत ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले होते. देशातील वीज वितरण क्षेत्रात खासगी क्षेत्राला वाव देणारी दुरुस्ती केंद्रीय वीज कायद्यात लवकर झाली नाही तरी कायद्यातील सध्याच्या तरतुदींचा वापर करून वीज वितरण व्यवसायाचा विस्तार करता येईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले होते.

अदानी समूहाने वीज वितरण व्यवसायाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या या महत्त्वाकांक्षेला मूर्तरूप देण्यासाठी आता पहिले पाऊल टाकले आहे. सध्या महावितरणच्या अखत्यारीत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका आणि लगतच्या परिसरात वीज वितरण करण्याचा समांतर परवाना मिळावा यासाठी अदानी समूहाने वीज आयोगाकडे अर्ज केला आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय वीज कायद्यात वीज वितरण परवान्याबाबतच्या कलमात असलेल्या तरतुदींचा वापर करून अदानीने हा अर्ज केल्याच्या समजते. पुरेसे भांडवल, बाजारातील पत आणि आचारसंहिता या निकषांची पूर्तता करणाऱ्याला समांतर वीज वितरण परवाना मिळू शकतो अशी मुभा त्या नियमांमध्ये आहे, असे सांगण्यात आले.

आता वीज आयोग या अर्जाची छाननी करेल आणि लोकांकडून सूचना हरकती मागवून त्यावर निर्णय देईल अशी प्रक्रिया आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई उपनगरात तत्कालीन रिलायन्सच्या वीज वितरण परवाना क्षेत्रात टाटा पॉवरला समांतर परवाना देण्यात आला होता. त्या वेळी रिलायन्सची विद्युत यंत्रणा वापरण्याची मुभा टाटा पॉवरला देण्यात आली होती. समांतर विद्युत यंत्रणा उभारणीच्या कोटय़वधी रुपये खर्चाचा बोजा वीज ग्राहकांवर पडू नये यासाठी तो निर्णय घेण्यात आला होता. आता नवी मुंबईत अदानीला महावितरणची विद्युत यंत्रणा वापरण्याची परवानगी मिळते की त्यांना स्वत:ची विद्युत यंत्रणा उभारण्याची अट टाकून वीजपुरवठा करण्याची परवानगी मिळते याबाबत उत्सुकता असणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

संबंधित बातम्या

गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना
सार्वजनिक वाहनतळ रोकडरहीत?
वीजदेयके माफ करा!; उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारला आव्हान
नवीन विहिरी, जलउपशावर बंदी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘मैं नही तो कौन बे’, आरशात स्वतःला पाहून माकडाने सुरु केलं भांडण अन् पुढं जे झालं…
IPL: आयपीएल चांगलीच! “विश्वचषकातील खेळाडूंच्या खराब कामगिरीवर..”, गौतम गंभीरने केले मोठे विधान
Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल
विश्लेषण: नवजात बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा कसा चालतो? ही समस्या उग्र का बनतेय?
हातकणंगलेमध्ये चार मोठ्या घराण्यांतील तरुण नेतृत्वाची चाचपणी