मुंबई : भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी ‘फॉलो-ऑन पब्लिक ऑफर’ (एफपीओ) असलेल्या अदानी एंटरप्रायझेसच्या समभाग विक्री वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शिवाय विक्री किमतीतही बदल करणार नसल्याचे अदानी समूहाने शनिवारी स्पष्ट केले. तसेच ‘एफपीओ’च्या माध्यमातून समभाग विक्री करून निश्चित निधी उभारणीबाबत समूहाने विश्वास व्यक्त केला.
अमेरिकी संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या संशोधन अहवालातील विविध प्रकारच्या अनियमितता आणि लबाडीच्या आरोपांनी अदानी समूहातील सर्वच कंपन्यांच्या समभाग मूल्याची गेल्या दोन सत्रांत मोठी वाताहत झाली. त्यानेच ‘एफपीओ’च्या सफलतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. परिणामी, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या समभागांना शुक्रवारी पहिल्या दिवशी बाजारातील एकंदर नकारात्मक बनलेल्या वातावरणाने अल्प प्रतिसाद मिळाला होता.
अदानी एंटरप्रायझेसचा ‘एफपीओ’ २७ जानेवारीपासून खुला झाला असून, गुंतवणूकदारांना त्यात ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. कंपनी या माध्यमातून ४ कोटी ५५ लाख समभागांची विक्री करणार आहे. त्या तुलनेत किरकोळ गुंतवणूकदारांकडून पहिल्या दिवशी केवळ ४.७ लाख समभागांसाठी बोली लावण्यात आली.
अदानी एंटरप्रायझेसने ‘एफपीओ’साठी ३,११२ ते ३,२७६ रुपये विक्री किमती निश्चित केली आहे. तसेच किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति समभाग ६४ रुपयांची अतिरिक्त सवलतही कंपनीने जाहीर केली आहे. मात्र, अदानी समूहातील दहा सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागात मोठय़ा घसरणीनंतर, अदानी एंटरप्रायझेसचा समभाग ‘एफपीओ’साठी निश्चित केलेल्या ३,११२ रुपयांच्या या किमान विक्री किमतीपेक्षा २० टक्क्यांनी खाली आला आहे. शुक्रवारच्या सत्रात अदानी एंटरप्रायझेसचा समभाग मुंबई शेअर बाजारात १८.५२ टक्के म्हणजेच ६२७.७० रुपयांनी घसरून २७६२.१५ रुपयांवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेसने ज्या वेळी ‘एफपीओ’ची घोषणा केली, त्या वेळी बाजारभावापेक्षा १३.५ टक्के सवलतीत समभागाची विक्री किंमत ठरविण्यात आली होती.