मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या विशेष महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. या कॅमेऱ्याद्वारे समाजकंटकांवर नजर ठेवली जाते. तसेच मोबाइल चोरी, पाकीटमारी यासारख्या घटना रोखल्या जातात. मध्य रेल्वेने ३११ डब्यांमध्ये १ हजार ९२४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच ८१ लोकलच्या महिला डब्यांमध्ये कॅमेरे लावले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी दिली.
सीएसएमटी येथील सभागृहात बुधवारी १२४ व्या क्षेत्रीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी खासदार अरिवद सावंत, धनंजय महाडिक, जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि क्षेत्रीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीच्या (झेडआरयूसीसी) ३९ सदस्यांसह उपस्थित होते. यावेळी महाव्यवस्थापक लालवानी म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस, डेमू, मेमू आणि एलएचबी अशा एकूण ३६४ डब्यांमध्ये २ हजार १३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तसेच ५९ स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स’ सुरू केले आहे. ऊर्जेची बचत करण्यासाठी ९२ स्थानकांवर सौर पॅनेल बसवले आहेत. मध्य रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ८ कोटींहून अधिक टन मालवाहतूक करून विक्रम केला आहे. यासह २५८ किमी नवीन मार्गिका टाकणे, मार्गिकेचे दुहेरीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत ८ सरकते जिने, ८ लिफ्ट बसवून मध्य रेल्वेवर एकूण १७४ सरकते जिने आणि १३८ लिफ्ट सुरू केल्या आहेत. तसेच चालू आर्थिक वर्षांत आणखीन १८ सरकते जिने आणि २५ लिफ्ट बसवण्याचे नियोजन आहे, असे लालवानी यांनी सांगितले.