प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी अनेक जण दुधीचा रस सेवन करू लागले आहेत. मात्र हा दुधीचा रस महाराष्ट्रातील तमाम वहिन्यांचे ‘भावोजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदेश बांदेकर यांच्यासाठी तापदायक बनला. कडू दुधीरस पिऊन आदेश बांदेकर यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. मात्र वेळीच उपचार केल्यामुळे ते बचावले.
गेल्या शुक्रवारी सकाळी आदेश बांदेकर चित्रीकरणासाठी कर्जतला निघाले होते. तत्पूर्वी त्यांनी दुधीचा ग्लासभर रस घेतला. त्यानंतर तासाभराने त्यांना रक्ताच्या उलटय़ा होऊ लागल्या. प्रकृती अधिकच चिंताजनक बनली आणि त्यांना तात्काळ पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. कडू दुधीचा रस प्याल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
कडू दुधीचे सेवन जीवावर बेतू शकते. या रसामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. मात्र वेळीच उपचार झाल्यामुळे सुदैवाने आदेश बांदेकर बचावले. आदेश बांदेकर यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. हिरानंदानी रुग्णालयातील डॉ. शालिनी सुराळकर, डॉ. गीता भल्ला आणि डॉ. अर्पिता यांनी त्यांच्यावर उपचार केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती. गेल्या आठवडय़ात ‘होम मिनिस्टर’चा जुनाच भाग पुन्हा दाखविण्यात आल्यामुळे ‘भावोजी’ कुठे गेले असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र त्यामुळेच त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे उजेडात आले.
कडू दुधीमुळे आरोग्य बिघडू शकते याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यामुळे दुधीचा रस अथवा दुधी खाताना प्रथम त्याचा छोटा तुकडा खावून पाहावा. तो कडू लागल्यास दुधी टाकून द्यावा, असे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adesh bandekar order to poison exposure
First published on: 25-12-2015 at 02:59 IST