मुंबई : कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन रायगड व रत्नागिरीतील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. रायगड पालकमंत्री पदाचा वाद गेली दीड वर्षे सुरु आहे. तटकरे की फलोत्पादन मंत्री भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार हा निर्णय होणे बाकी असताना तटकरे यांनी जिल्हयातील पावसाची स्थिती जाणून घेतली. एका अर्थाने त्यांनी जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारल्याचे चित्र आहे. त्याच वेळी गोगावले कुठे आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.
हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी सहा व सात जुलै रोजी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड मधील दोन नद्या अंबा, आणि कुंडलिका यांनी धोक्याची पातळी ओलंडली आहे. रायगडसाठी पुढील दोन दिवस धोक्याचे आहेत. तटकरे यांनी या हवामान स्थितीची आज राज्याच्या आपतकालीन विभागात जाऊन महिती घेतली. रत्नागिरी जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ४८ तास दोन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने रायगड व रत्नागिरी जिल्हया प्रशासनाला आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या.
संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाड येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. सुधागड व रोहा परिसरात आपत्कालीन परिस्थितीत अधिक वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देता यावा, यासाठी १४५ जवानांची अतिरिक्त तुकडी उपलब्ध करून देण्याची मागणी तटकरे यांनी केली आहे.
पूर आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कर्जत, खोपोली येथील विविध सेवाभावी संस्थांशी संर्पक साधण्यात आला असल्याचे तटकरे यांनी सांगितले. या संस्थांना शासनाकडून आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जातील. जिल्ह्याच्या इतर भागांमध्येही त्यांच्या सेवांची आवश्यकता भासल्यास त्यांचे सहकार्य घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
