मुंबई : चित्रपट दिग्दर्शक आदित्य धर यांनी ‘धुरंधर’ चित्रपटाची पटकथा चोरल्याचा आरोप करण्यापासून चित्रपट निर्माता संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे धर यांना दिलासा मिळाला आहे. कुमार यांच्याविरोधात सकृतदर्शनी सबळ पुरावे पटकथा चोरीचे आरोप करून कुमार हे वारंवार आपली बदनामी करत आहेत. यामुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा करून धर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि कुमार यांना आपल्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापासून मनाई करण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठापुढे धर यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी धार यांनी केलेल्या आरोपांचा विचार करता कुमार यांच्याविरोधात सकृतदर्शनी सबळ पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, पुढील सुनावणीपर्यंत कुमार यांनी धर यांच्याविरोधात कोणतीही बदनामीकारक विधाने किंवा तत्सम स्वरूपाचे आरोप करू नये, असे आदेश देऊन धर यांना दिलासा दिला.

प्रकरण काय ?

अभिनेता रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कुमार यांनी आपली ‘डी साहेब’ शीर्षकाखाली नोंदणीकृत असलेली पटकथा धर यांनी चोरल्याचा आरोप केला होता. धर यांनी सुरुवातीला कुमार यांना कायदेशीर नोटीस पाठवून कोणत्याही प्रकारच्या साहित्याची चोरी केली नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच यापुढे कोणतेही आरोप न करण्याबाबत सावध केले होते. परंतु, कुमार यांनी या नोटिशीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे धर यांनी अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.