Aditya Thackeray on MPCB Raid on Mercedes Benz : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (१२ सप्टेंबर) मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी मर्सिडीझ बेन्झवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाकलेली धाड आणि इतर विषयांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “आधीच महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर जात असताना, जे उद्योग इथे वर्षानुवर्षे आहेत, ज्यांच्यामुळे हजारो-लाखो तरुणांना रोजगार मिळाले आहेत, त्या उद्योगांना त्रास देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय साध्य करू इच्छित आहे?”
आदित्य ठाकरे यांनी एमपीसीबीला यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. या पत्रातून मर्सिडीझ बेन्झने पर्यावरणाचा नेमका कसा ऱ्हास केला आहे? त्यांनी नेमकं काय केलं आहे? असा प्रश्न विचारला आहे. तसेच त्यांनी कंपनीला निव्वळ भेट दिली होती की ती धाड होती? त्यांच्याकडून नेमका किती रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले .
“गिफ्ट सिटीच्या नावाने महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळफेक”
केंद्र सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “लोकांच्या डोळ्यात सरकारने धूळफेक केली. ग्लोबल इकोनॉमिक हब बनवायला इतका वेळ का लागतो आहे? आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र मुंबईला द्या. ही गिफ्ट सिटी तुम्ही महाराष्ट्राबाहेर म्हणजेच गुजरातला नेली. पण आता गिफ्ट सिटीचा मुंबईत उदो उदो केला जातोय. पण मुंबईचं नाव घेतलं जात नाही. यातून भाजप काय साध्य करू पाहतेय? तरुण-तरुणी नोकऱ्या नाहीत म्हणून आणि बेरोजगार आहेत म्हणून आंदोलन करत आहे”.
पियूष गोयल यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : आदित्य ठाकरे
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कारखान्यांवर अशा धाडी पडत असतील तर त्याचे केवळ महाराष्ट्रातल्या मर्सिडीज बेंझच्या कारखान्यावर नव्हे तर जर्मनीतल्या मुख्यालयातही परिणाम दिसतात, याची दखल घ्यावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले.