मुंबई: लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी मतचोरीचा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत. पारदर्शकपणे निवडणुका झाल्या तर त्यांना एक जागाही मिळणार नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी वाद निर्माण करून फूट पाडण्याचे राजकारण भाजपकडून सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
भाजपचा हिंदू-मुस्लिम राजकारण करण्याचा प्रयत्न असतो. जेथे हा प्रयोग यशस्वी होत नाही तेथे हिंदूंमध्ये भांडणे लावली जातात. जातीपातीचे राजकारण करण्यात येते. तेही चालत नाही म्हटल्यावर मराठी-अमराठीचे राजकारण भाजपकडून करण्यात येते. कोणत्याही प्रकारे मतचोरी करून निवडणुकांमध्ये घोळ केला जातो. स्वत:चीच माणसे निवडणूक आयोगात बसवून प्रत्येकाला १०-१० हजार रुपये वाटूनही आपल्याला निवडणुका जिंकता येतील, असा विश्वास भाजपला आहे. ते पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे जिंकायला गेले तर एक जागाही निवडून येणार नाही. त्यामुळे फूट पाडण्याचे राजकारण सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
विरोधी पक्षांनी भाजपची मतचोरी उघड केली आहे. बिहारमधील मतचोरीही आता लवकरच उघड करण्यात येईल. हरियाणामधील मतचोरी आम्ही उघड केली आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघातील मतचोरी उघडकीस आणली आहे. आतापर्यंत निवडणुकीनंतर आम्ही ते उघड करत होतो, मात्र आता प्रारूप मतदार यादीतील मतचोरी उघड झाली आहे. लाखो नावे संभाव्य दुबार म्हणून नोंदविण्यात आली आहेत. एका घरात १० पेक्षा जास्त मतदार दाखवले आहेत. अनेक ठिकाणी दुकानांमध्ये मतदार दाखवले आहेत. काही ठिकाणी सुलभ शौचालयातही मतदार नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे दुबार, तिबार आणि बोगस मतदार शोधण्याचे आमचे काम सुरू आहे. हे मतचोरीचे प्रकरण आम्ही लावून धरणार आहोत. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी, मतदार हक्काच्या रक्षणासाठी आमची लढाई सुरूच राहणार आहे, असे ते म्हणाले.
पालघर साधू हत्याकांडावरून भाजपकडून राजकारण करण्यात आले. तत्कालीन ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता त्यातील आरोपी काशीनाथ चौधरी याला भाजपने पक्षात घेतले. आक्षेप नोंदवल्यावर पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आली. हे भाजपचे बेगडी हिंदुत्व असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी अजित पवार यांच्या वक्त्याव्याचाही त्यांनी समाचार घेतला. मत दिले तर निधी देणार, अशी दादागिरीची भाषा महाराष्ट्रात चालणार नाही, आपल्या देशात लोकशाही, संविधान आहे, न्यायदेवता आहे. ही न्यायदेवता लवकरच न्याय करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
