मुंबई : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर विरोधकांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नांवर राज्यमंत्री उत्तर देणार का ? आपत्ती व्यवस्थापन मंत्री, कॅबिनेट मंत्री कुठे आहेत, असा सवाल भास्कर जाधव यांनी केल्यामुळे विधानसभेत गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ सुरू असतानाच अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांना ‘तू खाली बस’, असे म्हटल्यामुळे गोंधळ वाढला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले. अखेर ‘मंत्री गिरीश महाजन नुकसानग्रस्त भागात पाहणीसाठी गेले आहेत. मी खात्याचा राज्यमंत्री आहे. सरकारच्या वतीने मी उत्तर देणार आहे,’ असे आशिष जायस्वाल यांनी सांगितल्यानंतर कामकाज सुरळीत झाले.
राज्यात गत चार – पाच दिवसांपासून मुंबई-पुण्यासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. वसई – विरारमधील नागरिकांना गंभीर पूरस्थितीचा सामना करावा लागला. मात्र, यावेळी सभागृहात आपत्ती व्यवस्थापन अथवा कॅबिनेट मंत्री उपस्थित नसल्याचा आणि उत्तर राज्यमंत्री आशिष जायस्वाल देणार असल्यामुळे भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे आक्रमक झाले होते.
या वेळी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थितीत करत सरकारची बाजू मांडली. ‘सरकार संवेदनशीलपणे चर्चेला उत्तर देत आहे. मात्र, असे असतानाही सरकार बेताल आहे, अशा पद्धतीची असंसदीय भाषा केली जात असेल तर हे चालणार नाही,’ असे भातखळकर म्हणाले. या वेळी आदित्य ठाकरे उभे राहून आक्रमकपणे भूमिका मांडत असताना भातखळकर ‘तू खाली बस,’ असे म्हटल्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
‘नीट बोला, तुम्ही आम्हाला सांगू नका. राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. तुम्ही खाली बसा. नीट बोला, नीट बोला. तुमचे वय झाले आहे. तुमचे वय पाहून बोला. काय चाललंय ?’ असे म्हणत आदित्य ठाकरे यांनीही आक्रमक होत भातखळकर यांना सुनावले.
तुमचे ज्ञान लोकांना माहिती आहे. तुमची कुवत लोकांना माहिती आहे. तुमची झेप लोकांना माहिती आहे. सगळे लोकांना माहिती आहे, त्यात काही नवीन नाही. खूप घमेंडखोर. प्रत्येक वेळी फक्त अहंकार. तुम्हाला कोणी अधिकार दिला मध्ये बोलायचा ? राम मंदिरात चोऱ्या करणारे तुम्ही. तुमचे बोलणे अहंकारी आहे. जणू काही आपण सर्वज्ञ आहेत. तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहे. फक्त तुम्हाला कळते आणि बाकीच्यांना काही कळत नाही, अशी तुमची वागण्याची पद्धत आहे. तुम्ही कोणाला निष्ठा सांगता ? तुम्हाला पक्षात कोणी घेतले नव्हते, हे मला माहीत आहे. तुम्ही मला निष्ठा शिकवता ? असे म्हणत भास्कर जाधव भातखळकरांना चांगलेच झापले.
