लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी व कामगारांना विलंबाने वेतन मिळत आहे. परिणामी, घर तसेच इतर कामांसाठी काढलेल्या बँकेच्या कर्जाचे हफ्ते वेळेवर भरता येत नसल्याने अनेकांवर दंडात्मक कारवाई होत आहे. या पार्श्वभूमीवर, कामगारांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी त्यांचे पगार दर महिन्याच्या १ तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून केली आहे.
महानगरपालिकेच्या आस्थापना अनुसूचीवर जवळपास ९० हजार कामगार, कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे १ लाख १३ हजार सेवानिवृत्त वेतनधारक आहेत. सहा महिन्यांपूर्वी सर्वांना दर महिन्याच्या पहिल्या दिवशी वेतन मिळत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब होत आहे. काही दिसांपूर्वीच महापालिका कामगार सेनेने ही समस्या पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच, ऑगस्ट महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाकडेही चौकशी केली होती. बँकेकरून सकारात्मक प्रतिसाद मिळूनही समस्या जैसे थे आहे.
आणखी वाचा-नऊ वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात
गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवट लागू आहे. करोना काळात सर्व यंत्रणा ठप्प असताना महापालिका कामगार, कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रतिदिन ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला होता, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, सध्याचे सरकार पालिकेचा निधी अनावश्यक गोष्टींसाठी खर्च करीत असून कर्मचारी आणि इतर आवश्यक कामांसाठी राखून ठेवलेल्या मुदत ठेवी मोडण्याचा विक्रम करीत आहे, असा आरोप करीत पालिका कर्मचारी, कामगारांना विहित वेळेत वेतन देण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.