राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण तापू लागलं आहे. मुंबई मनपाने अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. अशात हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. दरम्यान, या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एंट्री होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या संदर्भात स्वत: आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा – “तुमच्या बापाच्या नावावर…”, ‘उद्धव बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का?’ प्रश्नावरुन सेनेचा हल्लाबोल; माँ साहेबांचाही उल्लेख

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून एक पोस्टर प्रकाशित करण्यात आले. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबरोबरच तेजस ठाकरे यांचाही फोटो असल्याने दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर तेजस ठाकरे राजकारणात येणार, अशी चर्चा रंगू लागली होती. त्यावर आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “तेजस ठाकरे हे राजकारणात येणार नसून यासंदर्भातील बातम्या खोट्या आहेत. यावरून कोणीही विश्वास ठेऊ नये. तेजस ठाकरे हे सद्या त्यांच्या वाईल्ड लाईफच्या कामात व्यस्त आहेत”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची ‘लाईव्ह’ सुनावणी होणार

दसरा मेळाव्याचा वाद उच्च न्यायालयात

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार हा प्रश्न अनुत्तरीत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर निर्णय देण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाने वकील जोएल कार्लोस यांच्यावतीने ही याचिका केली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिका आम्हाला परवानगी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे आमच्या अर्जावर मुंबई महानगरपालिकेला तातडीने निर्णय देण्याचे आदेश द्या, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.