मुंबईतल्या समुद्रात जाहिरातींचे तरंगते होर्डिंग्ज लावून मुंबईचं समुद्र विद्रुप करू नका अशी मागणी करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. जुहू, वांद्रे आणि वरळी भागात ही होर्डिंग्ज लावण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. या निर्णयाला आदित्य ठाकरेंनी कडाडून विरोध दर्शवला आहे. मुंबईकर आधीच जमिनीवरचं प्रदूषण सहन करत आहेत त्यांच्यावर आणखी अन्याय नको असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी पत्रात?

मुंबईतल्या समुद्रात तरंगते होर्डिंग्ज लावून शहराचं सौंदर्य विद्रुप करण्याच्या निर्णयाला माझा स्पष्ट विरोध दर्शवण्यासाठी मी हे पत्र लिहित आहेत. सतत वाढणारं प्रदूषण आणि त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, किनारपट्टीपासून थोड्या अंतरावरूनही आत शहरातील बहुतांश भागातून समुद्र व्यवस्थित दिसत नाही. अशात दुर्दैवाने होर्डिंग कंत्राटदारांच्या टोळीला पाठिंबा देण्याच्या या अवाजवी आणि व्यावसायिक हित जपणाऱ्या निर्णयामुळे जे काही थोडेफार चित्तवेधक दृश्य उरलं आहे तिथेही नागरिकांना डोळ्यांसमोर फक्त जाहिरातीच दिसतील. जमिनीवरील बेसुमार प्रदूषण आधीच सहन करणाऱ्या मुंबईकरांवर हा आणखी एक अन्याय आहे असं आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा आणि निर्णय थांबवावा-आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे पुढे म्हणतात, वास्तविक पाहता, मुंबईत रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास देणाऱ्या एलईडी होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवणारे आणि संपूर्ण मुंबईत होर्डिंग्जच्या संख्येवर मर्यादा घालणारे एक निश्चित धोरण असायला हवे. कंत्राटदारांच्या आर्थिक हितापेक्षा शहराचं सौंदर्य आणि नैसर्गिकता जपण्याला प्राधान्य देणे हाच नियम असायला हवा. दुर्दैवाने हा नियम सौंदर्याऐवजी कंत्राटदारांची निवड करतो आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण यात तातडीने हस्तक्षेप करावा आणि अत्यंत बेजबाबदार, संभाव्य भ्रष्टाचाराचा संशय असलेला आणि मुंबईचे सौंदर्य नष्ट करणारा हा निर्णय थांबवावा.

निर्णय नेमका काय आहे?

मुंबईतल्या समुद्रात जुहू, वांद्रे आणि वरळी या ठिकाणी समुद्रात तरंगत्या जाहिरातींचे होर्डिंग्ज लावण्याचा निर्णय बुधवारी समोर आला. वांद्रे वरळी सी लिंग, वरळी जेट्टी आणि जुहू चौपाटी या ठिकाणी हे असे तरंगते होर्डिंग्ज दिसतील असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं. या निर्णयाला आदित्य ठाकरेंनी आता कडाडून विरोध दर्शवला आहे. बुधवारीही आदित्य ठाकरेंनी एक पोस्ट लिहिली होती. असे निर्णय घेणाऱ्यांना थोडीशी तरी सौंदर्यदृष्टी आहे का? अशा प्रकाराचे होर्डिंग्ज लावणाऱ्या कंत्राटदाराला महाराष्ट्रविरोधी किंवा अर्बन नक्षल का म्हणू नये असा सवाल आदित्य ठाकरेंनी बुधवारी केला होता. आता या निर्णयात हस्तक्षेप करून सदर निर्णय थांबवावा अशी विनंती आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.