MNS Mira Road Assault Case: मुंबईतील मीरा रोड परिसरात दोन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. कथितपणे मराठीत बोलला नाही, म्हणून या व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मनसेच्या तीन कार्यकर्त्यांनी या व्यापाऱ्याला काही प्रश्न विचारले. तो मराठीत बोलत नव्हता, म्हणून त्याला मारहाण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. विशेष बाब म्हणजे, हे तिन्ही कार्यकर्ते त्या व्यापाऱ्याशी हिंदीतच संवाद साधत होते. याचबरोबर ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राजन विचारे यांच्यासमोर एका व्यापाऱ्याला मराठी बोलण्याची ताकिद देण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज विधान भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मीरा रोड परिसरातील मारहाणीच्या घटनेबाबत विचारण्यात आले होते.
पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “तुम्ही जो प्रश्न विचारला, तो फार महत्त्वाचा आहे. या प्रकरणी मी सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी आमच्या राजन विचारे यांच्याशीही या प्रकरणी बोललो. ही जी बाचाबाची किंवा मारहाण झाली आहे, ते मराठी किंवा अमराठी प्रकरण नाही. हा कोणत्याही भाषेचा वाद नाही.”
त्यांना मराठी येत नसेल, तर त्यांच्याविरोधात…
“तो व्यापारी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानेदेखील हात उचलला आहे. फोन चार्जिंगला लावण्यावरून झालेल्या बाचाबाचीनंतर ही मारहाण झाली आहे. यामध्ये कुठेही मराठी-अमराठीचा वाद नाही. मी आधीही स्पष्ट केले आहे की, जे लोक अलिकडे महाराष्ट्रात आले आहेत, त्यांना मराठी येत नसेल, तर त्यांच्याविरोधात काहीही भूमिका नाही. पण हिंदीसक्तीच्या विरोधात आम्ही लढत असून, त्याविरोधात आम्ही लढत राहू. प्रत्येक राज्यामध्ये त्या-त्या मातृभाषेचा मान राखलाच पाहिजे. कोणी त्याचा अपमान करू नये.”
दरम्यान मीरा रोड परिसरात व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, मनसेचा एक कार्यकर्ता व्यापाऱ्याला विचारत आहे की, तो स्थानिक भाषेत बोलण्याची काय गरज आहे? असे का विचारत आहे. यावर व्यापारी “मराठीत का बोलावे?”, असे म्हणतो. यानंतर काही क्षणता दुसरा कार्यकर्ता व्यापाऱ्याला “मार खयचा आहे का?”, असे म्हटल्याचे दिसत आहे.