मुंबई: हिंदूत्वावरून मनसे आणि शिवसेनेत सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणाने नवे वळण घेतले असून श्रीरामाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्येला जाणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. त्याच वेळी तिकडे अयोध्येत ‘असली आ रहा है नकली से सावधान’ अशा शब्दांत फलकबाजीतून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याला लक्ष्य करण्यात आले आहे.

‘हिंदूत्व’, ‘हनुमान चालीसा’ हे विषय हाती घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राजकीय भूमिकेची नवी भगवी शाल पांघरली आहे. त्यातील पुढचे पाऊल म्हणून राज ठाकरे यांचा ५ जूनला अयोध्या दौरा जाहीर झाला. त्यास उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा जाहीर करण्यात आला आहे.  आदित्य ठाकरे हे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. आमचा हा राजकीय दौरा नाही तर श्रीरामाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी आदित्य ठाकरे जात आहेत, असे सांगत नाव न घेता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा राजकीय कारणांसाठी असल्याचे सूचित केले.  तसेच अयोध्येमध्ये नकली भावनेतून जाणाऱ्याला रामलल्लाचा आशीर्वाद मिळत नाही, त्यांना विरोधच होणार अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्याने राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केल्याबाबतच्या प्रश्नावर दिली. अयोध्येत असली- नकलीबाबतचे फलक कोणी लावले माहिती नाही. उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे, असे विधानही राऊत यांनी केले.