मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळीत ‘स्वच्छता’ मोहीम राबवत शिवसेना (शिंदे) आक्रमक झाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत गेलेले विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालीच मंगळवारी वरळी कोळीवाडा आणि समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे या मोहिमेला विशेष महत्त्व आले आहे. स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळीत कचऱ्याचे साम्राज्य असल्याची टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला होता. त्यावेळी रहिवाशांनी परिसरातील अस्वच्छता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या गंभीर समस्या खासदार शिंदेंच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शिवसेनेच्या पथकाने परिसराची पाहणी करून ””स्वच्छ वरळी, सुंदर वरळी”” अभियानांतर्गत ही मोहीम हाती घेतली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनंतर ‘स्वच्छ वरळी, सुंदर वरळी’ अभियान सुरू करण्यात आले. नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात आले असताना स्थानिकांनी अस्वच्छता, कचरा आणि दुर्गंधीच्या समस्या शिंदे यांच्या निदर्शनास आणल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेने तातडीने मोर्चा वळवत स्वच्छता मोहीम हाती घेतली.
राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असून हा मतदार संघ शिवसेना (ठाकरे) पक्षाचा अभेदय बालेकिल्ला असल्याचे मानले जात होते. शिवसेना फुटीनंतर हा मतदार संघ हिसकावून घेण्यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाने अनेक प्रयत्न केले. अनेक माजी नगरसेवक फोडले. मात्र विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा विजय झाला पण मताधिक्य घटले. त्यातच दोन महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांची साथ सोडून सचिन अहीर यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्याच आदित्य ठाकरेंवर टीका करत सचिन अहीर यांनी स्वच्छता मोहीम राबवली. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेला विशेष महत्त्वआहे.
स्थानिक आमदारांचे अस्वच्छतेकडे दुर्लक्ष
अहिर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी समुद्रकिनाऱ्याची पाहणी करून साफसफाई केली. “ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून वर्षभर वरळी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विशेष आराखडा तयार केला जाईल,” असे अहिर यांनी सांगितले. “स्थानिक आमदारांचे वरळीतील अस्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे,” असा आरोपही अहिर यांनी केला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात शिंदेसेनेने सुरू केलेली ही स्वच्छता मोहीम केवळ कचरा साफ करण्यापुरती आहे की राजकीय आहे याची चर्चा वरळीत रंगली आहे.
