मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेला २१ मे पासून सुरूवात होणार असून अनेक विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची चिंता सतावत आहे. मुंबई विभागातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या १ लाख ४० हजार ७४ इतक्या जागा जास्त आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत १ हजार २६५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल ४ लाख ६१ हजार ६४० इतक्या जागा असून, दहावीच्या परीक्षेत ३ लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत प्रवेश क्षमता जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची चिंता मिटणार आहे.

यंदापासून संपूर्ण राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात तब्बल २० लाख ४३ हजार २५४ जागा अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मुंबई विभागासाठी यंदा ४ लाख ६१ हजार ६४० इतक्या जागा आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक २ लाख ७२ हजार ९३० जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल विज्ञान शाखेसाठी १ लाख ६० हजार ७१५ जागा आणि कला शाखेसाठी २२ हजार ९५५ जागा आहेत. मुंबई विभागातून यंदा दहावीच्या परीक्षेत ३ लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यानुसार तब्बल १ लाख ४० हजार ७४ इतक्या जागा अतिरिक्त आहेत.

आयटीआय, पॉलिटेक्निकचाही पर्याय

अकरावी प्रवेशाबराेबरच अनेक विद्यार्थी हे दहावीनंतर आयटीआय, पॉलिटेक्निक आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना पसंती देतात. सध्या राज्यामध्ये आयटीआयच्या जवळपास दीड लाख जागा, तर पॉलिटेक्निकच्या एक लाखांपेक्षा अधिक जागा आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक व व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता मुंबई विभागातून अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता नसणार असे चित्र आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांसमोर आव्हान

अकरावीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांचा कल हा नेहमीच नामाकिंत महाविद्यालयांकडे असतो. त्यामुळे अकरावीच्या अखेरच्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांची नामाकिंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी गुण कमी असतानाही घराजवळील कनिष्ठ महाविद्यालयाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यातच यंदा विद्यार्थ्यांपेक्षा जागा अधिक असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागा भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील जागांचा तपशील राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेत तब्बल २० लाख ४३ हजार २५४ जागा आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक ८ लाख ५२ हजार २०६ जगा असून, कला शाखेच्या ६ लाख ५० हजार ६८२ तर वाणिज्य शाखेच्या ५ लाख ४० हजार ३१२ जागा आहेत.