मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि स्पीच ॲण्ड लँग्वेज पॅथोलॉजी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर कले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ९ सप्टेंबर रोजी उपलब्ध जागांची माहिती मिळणार असून, १२ सप्टेंबर रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमापाठोपाठ सीईटी कक्षाने आयुर्वेद, होमियोपॅथी व युनानी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि स्पीच ॲण्ड लँग्वेज पॅथोलॉजी या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठी राज्यस्तरावर उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील सीईटी कक्षाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पंसतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

हेही वाचा – विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘महा वाचन उत्सव’, शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम

हेही वाचा – मालाड दुर्घटनाप्रकरणी पाच जणांना अटक

विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान सायंकाळी ६ वाजेपर्यंत पसंतीक्रम भरता येणार आहे. या चारही अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी १२ सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना १३ ते १८ सप्टेंबरदरम्यान महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपला अर्ज निश्चित करायचा आहे किंवा उत्तम महाविद्यालयाचा पर्याय निवडायचा आहे, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.