मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एएसी – कला शिक्षणमध्ये (फाइन आर्ट्स) सीईटीच्या प्रवेश नोंदणीस सुरुवात झाली. ही नोंदणी ३ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सीईटीअंतर्गत रेखा व रंगकला, शिल्पकला, वस्त्रकला, मातकाम अंतर्गत गृहसजावट, धातुकला, उपयोजित कला या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे.
एएसी – कला शिक्षण अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणी परीक्षा १० एप्रिल २०२६ रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. एएसी – कला शिक्षण सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये २७८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळाला विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.
एमएचटी सीईटी पीसीएम व पीसीबी समूह, एमबीए/एमएमएस, एमसीए, ३ व ५ वर्षीय एलएलबी, बी. एड., एमएड, बीएड-एमएड (३ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम), बी.पी.एड., एम.पी.एड., बी. एचएमसीटी/बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम, एम. एचएमसीटी, बी. डिझाईन, नर्सिंग, डीपीएन व पीएचएन या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरु आहे.
नोंदणीसाठी अपार आयडी व युडीआयडी बंधनकारक
यावर्षीपासून विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्याना युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडीआयडी) बंधनकारक करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व युडीआयडीची नोदणी करावी यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा. उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

