राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण तापू लागलं आहे. मुंबई मनपाने अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. अशात हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मात्र, तत्पूर्वी दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली नाही, तर शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा घेतील, अशी धमकी शिवसैनिकांकडून देण्यात येत होती. यावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना इशारा दिला आहे.

हेही वाचा – दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा धक्का देण्याची शिंदे गटाची योजना

नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार?

कोणीही शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, किंवा कायदा सुव्यवस्था बिघाडण्याचा प्रयत्न केला, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज आहे. देशात कायद्याचं राज्य आहे, असा इशारा मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना दिला आहे. राज्यात असं घुसखोरी करून कुठंही सभा घेता येत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रशासनाची परवानगी घ्यावीच लागेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच, कारण…”, मंत्री शंभुराज देसाईंचं वक्तव्य

दसरा मेळाव्याचा वाद उच्च न्यायालयात

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार हा प्रश्न अनुत्तरीत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर निर्णय देण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाने वकील जोएल कार्लोस यांच्यावतीने ही याचिका केली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिका आम्हाला परवानगी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे आमच्या अर्जावर मुंबई महानगरपालिकेला तातडीने निर्णय देण्याचे आदेश द्या, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.