मुंबई : वातावरणात सतत होणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रौढ लसीकरण मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात प्रौढांना न्यूमोनिया, इन्फ्लूएंझा आणि इतर संसर्गजन्य आजाराचा धोका कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या आणि त्यांच्यामध्ये आढळणारे संसर्गजन्य आजार लक्षात घेऊन प्रौढ लसीकरणवर (ॲडल्ट इम्युनायझेशन) विशेष लक्ष देण्याची गरज डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केली. वातावरणातील बदलामुळे आजार बळावत आहेत. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असून सध्या शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात खाटांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवते. न्यूमोनिया, इन्फ्लूएंझा, गंभीर श्वसनविकार, संसर्गजन्य आजार आणि इतर गुंतागुंतीच्या आजारांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना फुफ्फुसे, मूत्रपिंडा आदी अवयव निकामी झाल्यामुळे दीर्घकाळ अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागतात. अपघातग्रस्त, मेंदूला दुखापत झालेले, तसेच इतर अतिगंभीर रुग्णांना वेळेवर अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध होण्यास अडचणी येतात. अशा वेळी त्यांच्या जीवावर बेतू शकते, अशी खंत त्यांनी राऊळ यांनी पत्रात व्यक्त केली.
तर आजारांचे प्रमाण आटोक्यात राहील!
- जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य धोरणांचा विचार करून ५५ वर्षांवरील नागरिकांसाठी आवश्यक प्रौढ लसीकरण मोहीम राबविल्यास न्यूमोनिया, एन्फ्लूएन्झा, तसेच इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- परिणामी, आरोग्य व्यवस्थेवरील भार कमी होऊ शकेल. विकसित, विकसनशील देशांमध्ये
प्रौढ लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत असून शासनातर्फे विविध लसी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने प्रौढ लसीकरणाबाबत व्यापक मोहीम राबवावी. – वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र नागरिकांना महापालिका, शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक लसी मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती डॉ. शुभा राऊळ यांनी पत्रात केली आहे.
