मुंबई : गणेशोत्सव संपल्यानंतर पालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून संपूर्ण मुंबईतील जाहिरात फलक हटवण्याचीही मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीनंतर २४ तासांत पालिकेच्या परवाना विभागाकडून १४ हजारांहून अधिक जाहिरात फलक, भित्तीपत्रके, कमानी, झेंडे हटवण्यात आले आहेत.

गणेशोत्सव काळात धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक जाहिरात फलकांचे पेव फुटले होते. गणेशोत्सव मंडळांना जाहिरात देणाऱ्या राजकीय पक्षांच्या, लोकप्रतिनिधींच्या, विविध व्यावसायिक संस्थांच्या जाहिराती मंडळाच्या परिसरात लावण्यात आल्या होत्या. मुंबईत प्रत्येक गल्लीत सार्वजनिक गणेश मंडळ असल्यामुळे गणेशोत्सव काळात जाहिरातींनी सगळे रस्ते व्यापले होते. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. गणेशोत्सव पार पडल्यानंतर जाहिरात फलक काढण्याचे काम मंडळे करीत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या परवाना विभागाने यंदा जाहिरात फलक काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.

हेही वाचा – मुंबई : गणेशोत्सवात ५५० मेट्रीक टन निर्माल्य संकलित, चौपाट्यांवरून ३६३ मेट्रीक टन घनकचरा जमा

पालिकेच्या परवाना विभागाने अनंत चतुर्दशीनंतर चोवीस तासांत संपूर्ण मुंबईतून तब्बल १४ हजारांहून अधिक जाहिरात फलक, बोर्ड, भित्तीपत्रके, कमानी, झेंडे हटवले आहेत. त्यात धार्मिक, राजकीय, व्यावसायिक जाहिरात फलकांची संख्या सर्वाधिक होती. सर्वाधिक ७६५६ धार्मिक फलक मुंबईतून हटवण्यात आले आहेत. त्या खालोखाल ८०७ राजकीय आणि २६० व्यावसायिक जाहिरात फलक हटवण्यात आले आहेत. सर्वाधिक फलक अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भाग असलेल्या के पश्चिम विभागातून हटवण्यात आले आहेत.

हेही वाचा – मुंबई : लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दागिने, मोबाइलची चोरी; सात लाखांचे दागिने, कॅमेरा चोरीला

एकूण जाहिरात फलक, भित्तीपत्रके हटवली – १४,२९५

एकूण जाहिरात फलक – ८७२३

धार्मिक फलक – ७६५६

राजकीय – ८०७

व्यावसायिक – २६०

झेंडे – ९८५

भित्तीपत्रके – ६५७