रेश्मा शिवडेकर

जनता संचारबंदी’नंतर दोनच दिवसांनी केंद्र सरकारने देशभर अनपेक्षितपणे टाळेबंदी जाहीर केली आणि उद्याच्या चिंतेने मुंबईतील बाजारपेठा रात्री नऊच्या सुमारास गजबजल्या. सर्वसामान्य भारतीय जेव्हा गहू, तांदूळ, भाजीपाला, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची बेगमी करत होते, तेव्हा हातावर पोट असलेल्या एका हतबल वर्गाचा आपल्या गावाकडे प्रवास सुरू झाला होता. आता चौथी टाळेबंदी येऊ घातली तरी या वर्गाची परवड थांबलेली नाही. ही परवड, हतबलता इतकी की आतापर्यंत ११५हून अधिकांना आपला जीव गमवावा लागला.

यात जसे सार्वजनिक वाहन नसल्याने पायीच घरी निघालेले तरुण, मध्यमवयीन होते, तसे रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचाराविना गेलेले ज्येष्ठ नागरिक आणि तान्हे मूलही होते. ४०-४२ अंश सेल्सिअस तापमानात घराकडे चालत निघालेल्या किमान आठ जणांचा तरी उष्माघाताने, हृदयविकाराने मृत्यू झाला. तर दोन तान्ही बाळे रुग्णवाहिका न मिळाल्याने आजारपणाने मृत्यू पावली.

पहिल्या टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहनांवरील निर्बंध कडक असल्याने अनेक मजूर पायीच निघाले. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या काहींचा ट्रक, ट्रेलर, टेम्पो, रेल्वेने चिरडल्याने मृत्यू झाला. त्यात आठ जण उष्माघाताने, हृदयविकाराच्या झटक्याने गेले. यात कोकणात जाणाऱ्या तिघांचा समावेश आहे. टाळेबंदी पाळण्यावरून काहींच्या घरातील ताणतणाव इतके  टोकाला गेले की, त्यात एकाने गरोदर पत्नीचा तर एकाने तरुण भावाचा जीव घेतला. दोघा जणांना तर ‘जनता-जनार्दना’ने ठेचले. टाळेबंदी काळातला एकटेपणा व नंतरची भविष्याची चिंता यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्या.

तिसरा टप्पा अधिक जीवघेणा.. : परप्रांतीयांकरिता प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध शिथिल होऊनही योग्य नियोजनाअभावी टाळेबंदी-३ अधिक जीवघेणी ठरते आहे. या काळात परप्रांतीयांना आपल्या राज्यात जाण्याची मुभा देण्यात आली. मात्र रेल्वे, बसगाडय़ा सुटण्यास विलंब होत असल्याने परप्रातीयांच्या अस्वस्थतेचा फायदा ठिकठिकाणचे दलाल घेत आहेत. काही हजार रुपयांमध्ये गावाकडे पोहोचविण्याचे स्वप्न दाखवत, नियम डावलून एकेका ट्रक-टेम्पोत वाट्टेल तसे प्रवाशांना कोंबले जात आहे. हा प्रकार आतापर्यंत शंभर-एक मजुरांच्या जीवावर बेतला आहे.

असे का होतेय?

हे कामगार, मजूर पायी किंवा मिळेल त्या साधनाने गावाकडे परतण्याची जोखीम घेतात याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना विचारले असता ते म्हणतात, कसोटीच्या काळात माणसाची आपल्या घराकडे परतण्याची आदिम प्रेरणा तीव्र होते. मग ते घर नंदनवन नसले तरी तिथे परतण्याची ओढ लागते. या ओढीपायी अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले. जगभरात या कारणापायी झालेल्या युद्धांचा अभ्यास के ला तरी ही प्रेरणा समजून घेता येईल. परप्रांतीयांच्या राहण्याचे, जेवण पुरविण्याचे नियोजन सरकारने केले. मात्र त्याही पुढे जाऊन त्यांचे भावनिक ‘प्रोजेक्शन’ समजून घेण्यास सरकारी यंत्रणा कमी पडली.